प्रदूषणामुळे माणूसच नव्हे तर, पशू-पक्षीही घायकुतीला..!

प्रदूषणामुळे माणूसच नव्हे तर, पशू-पक्षीही घायकुतीला..!
प्रदूषणामुळे माणूसच नव्हे तर, पशू-पक्षीही घायकुतीला..!

मुंबई : प्रदूषणाचा फटका फक्त माणसांनाच नाही, तर पक्ष्यांनाही बसू लागला आहे. घार आणि घुबडासारखे मोठे पक्षी प्रदूषणाला बळी पडत आहेत. परळ येथील पशू-पक्षी रुग्णालयात वर्षभरात उपचारासाठी येणाऱ्या घारींपैकी २५ ते ३० टक्के घारी प्रदूषणामुळे बेहाल झालेल्या असतात.

परळ येथील बाई सकराबाई दिनशा पेटिट प्राणी रुग्णालयात सध्या १५ घारींवर उपचार सुरू आहेत. त्यांतील किमान चार घारी प्रदूषणामुळे अत्यवस्थ असून, उर्वरित घारींना उन्हाचा चटका बसला आहे, असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक कर्नल डॉ. जे. सी खन्ना यांनी सांगितले. वायुप्रदूषणामुळे पक्ष्यांना श्‍वसनाचे आजार होतात. श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्यावर हे पक्षी एकाच जागी पडून राहतात. त्यामुळे त्यांना तापही भरतो. 

ही बातमी वाचली का? कोंढाणे धरणाचे पाणी सिडकोला देणार नाही

घारीसारखा मोठा पक्षी इतर पक्ष्यांचे भक्ष्य ठरत नाही; परंतु चिमणी, कावळा, कबुतर असे पक्षी निपचित पडल्यास इतर पक्षी आणि प्राण्यांचे भक्ष्य ठरतात. त्यामुळे हे पक्षी सामान्यपणे उपचारांसाठी येत नाहीत. म्हणूनच रुग्णालयांत येणाऱ्या घारींचे प्रमाण अधिक आहे, असे डॉ. खन्ना म्हणाले. प्रत्येक महिन्याला २० ते २५ घारी या रुग्णालयात दाखल होतात. जखमी पक्ष्यांना प्रतिजैविके, जीवनसत्त्वे व अन्य औषधे दिली जातात. त्यांना ग्लुकोजचे पाणीही पाजले जाते, अशी माहिती त्यांनी दिली.

चिमण्या, कावळे यांच्यापेक्षा घार हा वेगाने उडणारा पक्षी आहे. उंचावर उडत असल्याने त्याच्या श्‍वसनाचा वेग जास्त असतो. त्यामुळे घारीला प्रदूषणाचा अधिक फटका बसतो, असे वातावरण फांऊडेशनचे संस्थापक भगवान केसभट यांनी सांगितले.

महापालिकांनी पर्यावरण आराखडा तयार करणे बंधनकारक असून, त्यात प्रदूषणनियंत्रणावर भर देणे अपेक्षित आहे; परंतु अनेक महापालिकांनी असा आराखडा तयार केलेला नाही. हा आराखडा तयार करताना पशू आणि पक्ष्यांवर होणाऱ्या प्रदूषणाच्या परिणामांचाही विचार व्हायला हवा.
- भगवान केसभट, संस्थापक, वातावरण फांऊडेशन 

काही वर्षांत प्रदूषणामुळे श्‍वसनाचा त्रास होणाऱ्या पक्ष्यांचे प्रमाण वाढले आहे. सणांच्या काळात पशु-पक्ष्यांना प्रदूषणाचा जास्त त्रास होतो. वर्षभरही पक्षी उपचारांसाठी येत असतात; त्यापैकी २० ते २५ टक्के पक्ष्यांना प्रदूषणाचा फटका बसलेला असतो. त्यांच्यात घारीसारख्या मोठ्या पक्ष्यांचे प्रमाणे अधिक असते.
- डॉ. जे. सी. खन्ना, वैद्यकीय अधीक्षक, बाई सकराबाई दिनशा पेटिट प्राणी रुग्णालय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com