"मिर्ची'चे "बेहिशेबी' प्रकरण : वाधवाच्या कोठडीची मागणी करणार 

file photo
file photo

मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा विश्‍वासू हस्तक असलेल्या इक्‍बाल मिर्ची याच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अटक करण्यात आलेला दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा (डीएचएफएल) मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवा याला कोठडी मिळावी, अशी मागणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) करणार आहे. 

वाधवा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तसेच, सोमवारी (ता. 3) याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि सुहाना ग्रुपचे सुधाकर शेट्टी यांचीही चौकशी होण्याची शक्‍यता आहे. 
शेट्टी यांच्याशी संबंधित ठिकाणी गुरुवारी (ता. 30) "ईडी'ने शोधमोहीम राबवली होती. त्यात शेट्टी यांच्या पश्‍चिम उपनगरातील घराचाही समावेश होता. 

"डीएचएफएल'मध्ये 12 हजार 773 कोटी रुपयांचे मनी लॉंड्रिंग करण्यात आले असून, त्यासाठी एक लाख बनावट ग्राहक व 79 कंपन्यांचा वापर करण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. याप्रकरणी वाधवाला अटक झाल्यानंतर त्याने स्वाईन फ्लू झाल्याचा दावा केला होता. न्यायालयाच्या निर्देशानुसार गुरुवारी त्याची जेजे रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने न्यायालयात नेण्यात आले नव्हते. 

ईडीने न्यायालयाकडे वाधवाची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने 3 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. वाधवाची तब्येत ठीक नसल्याने ईडीला याप्रकरणी चौकशी करता आली नाही. त्यामुळे तब्येत बरी झाल्यानंतर वाधवाच्या कोठडीची मागणी करण्यात येईल, असे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

डीएचएफएलने 2010-11 मध्ये फेथ रिऍल्टीला 685 कोटी, मार्व्हल टाऊनशिपला 510 कोटी, एबल रिऍल्टीला 215 कोटी, पॉसायडॉन रिऍल्टीला 392 कोटी, रॅण्डम रिऍल्टीला 352 कोटी असे एकूण 2154 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. जुलै 2019 पर्यंत हे कर्ज फेडण्यात आले नव्हते. या व्यवहारांची कोणतीही कागदोपत्री नोंद डीएचएफएलच्या कार्यालयात ईडीला सापडली नाही. कर्ज वितरणाचे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट झाले. या पाच कंपन्या बनावट असल्याचा ईडीला संशय आहे. 


शेट्टी रडारवर कसे? 
इक्‍बाल मिर्चीच्या वरळीतील मालमत्ता व्यवहाराबाबत तपास करत असताना ईडीच्या रडारवर डीएचएफएल आली. त्या व्यवहारातील सनब्लिंक आणि डीएचएफएल यांच्यातील दुवा तपासात उघड झाला. हे व्यवहार पुढे बांधकाम व्यावसायिक सुधाकर शेट्टी यांच्याशी संबंधित कंपनीपर्यंत पोहोचल्याने ईडीकडून पडताळणी सुरू आहे. त्यामुळे सोमवारी शेट्टी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com