esakal | पोलिसांची अशीही माया...एका मायला मिळवून दिला आसरा
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पोलिसांची अशीही माया...एका मायला मिळवून दिला आसरा

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली - पोलीस (Police) म्हटले की खाकी वर्दीतील तापट स्वभावाची असंवेदनशील व्यक्ती अशी सर्वसाधारण प्रतिमा जनमानसात असते. परंतु या वर्दीतही संवेदनशील मन असलेला मनुष्य असतो याचा प्रत्यय डोंबिवलीत (Dombivali) आज घडून आला. केवळ माणसांप्रती नाही तर प्राण्यांप्रतीही संवेदनशीलता डोंबिवली तील पोलिसांनी (Police) दाखवली आहे. त्यांना जागरूक नागरिकांनीही तेवढीच साथ दिल्याने आज एका भटक्या गर्भवती गाढवाला मायेचा आसरा मिळाला आहे.

जिथे माणसांची कदर होत नाही तिथे प्राण्यांची कोण करतो? मात्र या सगळ्याला कुठे ना कुठे अपवाद असतोच. डोंबिवलीकर या अपवादाला पात्र ठरले आहेत. पूर्वेतील रामनगर परिसरात एक गाढव गेले काही दिवस असेच फिरत होते. रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस नाईक स्वाती मुळ्ये यांची नजर त्या भटकणाऱ्या गाढवावर गेली. एका पाडलेल्या इमारतीच्या बांधकामाजवळ ते दिसत असल्याने सुरवातीला त्यांना तिथे ते ओझी वाहण्यासाठी आणले का ? याविषयी त्यांच्या मनात प्रश्न येत होते. मात्र ते गाढव गर्भवती असल्याचे प्रथम पाहणीत दिसून येते त्यात त्याच्या पाठीला एक जखम देखील झाली आहे. अशा परिस्थितीत त्याला कामाला कोण जुंपत आहे का याचा त्यांनी शोध घेतला मात्र कोणी आढळून आले नाही. अखेर स्वाती यांनी समाज माध्यमावरील एका प्राणीमित्र ग्रुप वर या गर्भवती गाढवा संबंधित पोस्ट टाकली. पूर्वेतील तनिष्क दुकानाजवळ गर्भवती गाढव कोणी तरी सोडून गेले आहे. गेले 4 ते 5 दिवस ते तिथेच उभे आहे.

सकाळी दुकाने उघडताना या परिसरातील दुकानदार त्याला हकलवतात. त्याला तातडीने सुखरूप स्थळी हलविणे आहे. या पोस्टला डोंबिवलीतील जागरूक नागरिकांनी लगेच प्रतिसाद दिला. अनेकांनी प्राणीमित्र संघटना, रुग्णालये, सांभाळ केंद्र यांचा नंबर दिला. बोलणी सूरु केली. दर्शक शहा, अक्षय दुसाने या तरुणांनी त्याचा शनिवारी सकाळी शोध घेत त्याला शहरातील वर्दळीच्या ठिकाणापासून दूर आणले. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात त्याला ठेवण्यात आले आहे. पनवेल येथील (hands that heal animal care foundation) या संस्थेने या गाढवाचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेतली आहे.

हेही वाचा: अभिमानास्पद! भारतीय वंशाचे अनिल सोनी WHO फाऊंडेशनच्या प्रमुखपदी

फाऊंडेशनच्या अनामिक चौधरी म्हणाल्या, डोंबिवलीत 10 ते 12 गाढवे अशीच रस्त्यावर सोडून देण्यात आली आहेत, ही फार मोठी समस्या आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी अनिमल केअर संस्था प्रयत्न करीत आहेत. तसेच त्यांच्या मालकाचा शोध लागणेही गरजेचे आहे. त्याने गरजेला या गाढवांचा उपयोग करून घेतला आणि नंतर असे सोडून दिले आहे.

डोंबिवलीतील जागरूक नागरिक आणि पोलीस प्रशासनाच्या या तत्परतेमुळे एका गर्भवती मायला आसरा मिळाला आहे. प्राण्यांप्रती दाखविलेल्या या संवेदनशीलते मुळे पोलीस प्रशासन आणि जागरूक नागरिकांचे कौतुक होत आहे.

loading image
go to top