कर्मचारी दुविधेत : कामावर हजर राहण्याचं तर फर्मान आलंय पण जीवासह नोकरीही चिंता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 मे 2020

कामावर हजर होण्याचे फर्मान आल्याने आम्ही दररोज कामावर जात आहोत खरे, परंतू आता कानावर पडणाऱ्या दररोजच्या बातम्यांनी मनात चिंतेचे काहूर माजू लागले आहे.

ठाणे : कामावर हजर होण्याचे फर्मान आल्याने आम्ही दररोज कामावर जात आहोत खरे, परंतू आता कानावर पडणाऱ्या दररोजच्या बातम्यांनी मनात चिंतेचे काहूर माजू लागले आहे. एकीकडे नोकरी जाण्याची भिती तर दुसरीकडे कोरोनाची लागण होण्याची भिती. दररोज सकाळी कामासाठी बाहेर पडताना एकच विचार येतो की आपण सुरक्षित घरी येऊ ना? आपल्यामुळे आपल्या घरच्यांना त्रास होणार नाही ना? आपण काळजी घेतोय पण ती पुरेसी आहे का? कामाच्याच ठिकाणी राहणे योग्य आहे का? पण आपल्यासाठी ती सोय कोण करणार? असे असंख्य प्रश्न मनात आहेत, ज्यांची उत्तरे तर सापडत नाहीत, पण सततच्या चिंतेने मात्र आम्हाला ग्रासले आहेत. या प्रतिक्रिया आहेत नोकरीनिमित्त मुंबईत कामावर जाणाऱ्यांच्या....

मोठी बातमी : अडकलेल्या नागरिकांनो! घरी जाण्यासाठी ST महामंडळाशी असा साधा संपर्क

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, त्यात गेले काही दिवस कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत त्यामध्ये बहुसंख्य रुग्ण हे मुंबईत कामानिमित्त जाणारे आहेत. कोणी सरकारी नोकर आहे, कोणी अत्यावश्यक सेवेत येणारे कर्मचारी आहेत, तर कोणी खासगी कंपनीत काम करणारे कर्मचारी. कल्याण डोंबिवलीतील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 300 चा टप्पा पार केला असून यातील 150 हून अधिक रुग्ण हे मुंबईत नोकरी करणारे व त्यांचे निकटवर्तीय सहवासित आहेत.

मोठी बातमी धक्कादायक ! कोरोनामुळे सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु असून आता पालिका कार्यालय व काही खासगी कार्यालये काही प्रमाणात कर्मचाऱ्यांना पाचारण करुन सुरु करण्यात आली आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही कामावर हजर राहण्यास सांगितले जात आहे. परंतू मुंबईतील रुग्णांचा वाढता आकडा आणि त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांना होणारी लागण यामुळे मुंबईत कामानिमित्त जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनात चिंतेचे काहूर माजले आहे. याविषयी सकाळच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचीत केली. यामध्ये काही नोकरी टिकविण्यासाठी, महिन्याचे वेतन मिळण्यासाठी तर कोणी अत्यावश्यक सेवेत येत असल्याने व आता जाण्याशिवाय पर्याय नसल्याने कामावर जात आहेत. तर काहींनी मात्र आपले भ्रमणध्वनी बंद ठेवून, आमचा विभाग सील केला असल्याचे कारण देऊन अद्यापही कामावर जाण्याचे टाळले असल्याचे लक्षात आले. 

हे ही वाचा : अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची युवा सेनेची यूजीसीकडे मागणी

मी एका खासगी कंपनीत काम करतो, गेले महिनाभर कामावर जात आहे. दोन दिवस काम, दोन दिवस सुट्टी यापद्धतीने आमचे काम सुरु आहे. कामावर हजर न झाल्यास वेतन कपात करण्यात येईल असे आम्हाला कंपनीकडून सांगण्यात आले आहे. घराचे लोन काढलेले आहे, तो हप्ता भरण्यापुरते तरी वेतन आले पाहीजे म्हणून मी कामावर जात आहे, नाही तर मी सुद्धा आत्ताची परिस्थिती पाहता न जाणेच पसंत करेल. 
 - आतिष जोशी, खासगी कंपनीतील कर्मचारी

मी सरकारी कार्यालयात काम करते, काही दिवसांपूर्वीच आम्हाला कामावर हजर होण्याची सूचना देण्यात आली आहे. परंतू आमचा प्रभागच सील केलेला असल्याने आम्हाला बाहेर पडण्यास बंदी आहे. त्यात बसमधून गर्दीतून प्रवास करणे म्हणजे स्वतः कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे. मी अद्यापपर्यंत तरी कामावर हजर झालेले नाही आहे, पुढे काय होते पाहूया.
- अंजली चौरासिया, सरकारी कर्मचारी

कंपनीतून एवढे कर्मचारी कमी केले, वेतन कमी केले अशा बातम्या सतत कानावर येतात. अर्थव्यवस्था आपली ढासळणारच आहे. त्यात आम्हालाही कंपनीने कामावर हजर न झाल्यास पुढे विचार करण्यात येईल असे सांगितले आहे. नोकरी गेली तर पुढे काय करायचे. घराचा हप्ता, विमा कंपन्यांचे हप्ते आहेत. मुलांचे शिक्षण, घरखर्च सारेच कसे भागणार. पुढे दुसरीकडे नोकरी मिळण्याचेही काही खरे नाही. नोकरी टिकवून ठेवण्यासाठीच मी कामावर जातो. नोकरी आणि जीव धोकांची भिती आहे, पण आता आर या पार करणेच आहे. 
- स्वप्नील राजपूत, खासगी कंपनीतील कर्मचारी

मध्यंतरी पालिका आयुक्तांनी निर्णय घेतलेला मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुंबईत सोय करा, तेही ठिक वाटते, किमान आपल्यामुळे आपल्या घरच्यांना त्रास नको. परंतू कंपन्यांनीही तशी सोय केली पाहीजे. त्यांना तशा सूचना दिल्यास आम्ही दोन तीन दिवस काम करुन नंतर एक दिवस घरी येणे पसंत करु. परंतू महिला कर्मचाऱ्यांना थोडा त्रास होईल काहींचे लहान मुले आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. 
-प्रतीक टाकेकर, खासगी कंपनीतील कर्मचारी

Fear of both job and life, employees in trouble


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear of both job and life, employees in trouble