
जगाचे लक्ष लागलेल्या "कोव्हॅक्सिन' लसीच्या अंतिम चाचणीला शीव रुग्णालयात लवकरच सुरुवात होणार आहे. सुरुवातीला एक हजार स्वयंसेवकांना तीन महिन्यांत कोव्हॅक्सिन दिली जाणार आहे. चाचणी यशस्वी होताच भारतासह जगभरात ही लस वितरीत करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मुंबई : जगाचे लक्ष लागलेल्या "कोव्हॅक्सिन' लसीच्या अंतिम चाचणीला शीव रुग्णालयात लवकरच सुरुवात होणार आहे. सुरुवातीला एक हजार स्वयंसेवकांना तीन महिन्यांत कोव्हॅक्सिन दिली जाणार आहे. चाचणी यशस्वी होताच भारतासह जगभरात ही लस वितरीत करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. चाचणीला एथिक कमिटीची परवानगी मिळाली असून, पुढील एक-दोन दिवसांत शीव रुग्णालयात चाचणीला सुरुवात होईल, अशी माहिती शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.
राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयात आतापर्यंत 16 स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिनचा डोस दिला आहे. वैद्यकीय चाचणीला परवानगी दिल्यानंतर शनिवारी (ता. 28) आठ जणांना लसीचा डोस दिला, तर सोमवारीही (ता. 29) आठ जणांना लस देण्यात आली. आयसीएमआरच्या नियमांनुसार प्रत्येक केंद्रात किमान हजार स्वयंसेवकांना लस दिली जाणार आहे. शिवाय प्रत्येक वैद्यकीय चाचणीला विमा दिला गेला आहे. यादरम्यान स्वयंसेवकांना होणारा किंवा झालेला त्रास पाहून एथिक कमिटी आणि डीसीजीआयची कमिटी त्यावर निर्णय देते. किमान वर्षभर चालणारी ही प्रक्रिया आहे. "भारत बायोटेक' आणि "आयसीएमआर'ने ही लस तयार केली, अशी माहिती कोव्हॅक्सिन क्लिनिकल ट्रायलचे सहअन्वेषक डॉ. दिनेश धोडी यांनी दिली.
भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली कोव्हॅक्सिन एक हजार स्वयंसेवकांना दिली जाणार आहे. आतापर्यंत शीव रुग्णालयात 300 स्वयंसेवकांची नोंद केल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले. जगभरात कोरोनावर लस तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, मुंबईतील शीव रुग्णालयात कोव्हॅक्सिन देण्याच्या अंतिम टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. एक हजार स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिन दिली जाणार आहे. स्वयंसेवकांवर कुठलाही परिणाम झाला नाही तर तो अहवाल भारत बायोटेक कंपनीला पाठवण्यात येणार आहे. कंपनीने चाचणी यशस्वी झाल्याचे स्पष्ट करताच जगभरात कोरोना लसीचे वितरण भारतातून करण्यात येणार आहे.
चाचणीकडे जगाचे लक्ष
शीव रुग्णालयात अंतिम चाचणी यशस्वी झाल्यानंतर प्रथम रुग्णालय कर्मचारी ज्यांनी कोरोनाशी संबंधित प्रत्यक्ष काम केले आहे, अशांना ही लस दिली जाईल. त्यानंतर मुंबईत लस उपलब्ध होईलच; पण सीरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जगभरात या लसीचे वितरण करण्यात येईल. त्यामुळे आता जगभरातील देशांचे लक्ष शीव रुग्णालयात होणाऱ्या कोव्हॅक्सिनच्या अंतिम चाचणीकडे लागले आहे.
--------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)