ठाण्यात लेक सिटी मॉलला आग 

File Photo
File Photo

ठाणे : ठाण्यातील कापूरबावडी येथील लेक सिटी मॉलला शनिवारी (ता. 15) दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दल आणि ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी वेळीच पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. संपूर्ण काचेच्या तावदानांनी बंदिस्त असलेल्या या मॉलच्या आगीवर नियंत्रण मिळवताना बचाव पथकांची दमछाक झाली होती; मात्र सायंकाळी उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीमुळे प्रचंड प्रमाणात धूर झाल्याने अग्निशमन कर्मचाऱ्यासह अन्य एक जण बाधित झाला. दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ठाणे पश्‍चिमेकडील कापूरबावडी नाक्‍यावर बाळकुम अग्निशमन केंद्राजवळ तळ अधिक चार मजली लेक सिटी मॉल आहे. शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग लागून आगीची धग दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहचली. संपूर्ण मॉलमध्ये धुराचे लोट पसरल्याने मॉलमध्ये घबराट पसरली होती.

घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दल, महावितरण पथक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने मॉलच्या चौथ्या मजल्यावर अडकलेल्या नामदेव झोरे या मॉल कर्मचाऱ्यासह सुमारे 350 नागरिकांची सुखरूप सुटका केली; तर आगीवर नियंत्रण मिळवताना धुरामुळे अग्निशमन दलाचे फायरमन रवींद्र जयराम शेलार यांचा श्वास कोंडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती ठीक असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे. या आगीमुळे मॉलची अग्निसुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून काचेच्या तावदानानी बंदिस्त इमारतीच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. 

काचा फोडून आगीवर नियंत्रणाचा प्रयत्न 
दरम्यान, मॉलच्या काचा फोडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करूनही सायंकाळी उशिरापर्यंत आगीची धग जाणवत होती. त्यामुळे मॉल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली 5 फायर इंजिन, 2 जम्बो टॅंकर, 3 वॉटर टॅंकर, 4 रेस्क्‍यू वाहने, 1 पेस्ट कंट्रोल वाहन आदी 15 वाहनांच्या साह्याने आणि आठ जलवाहिन्या टाकून आग विझवण्यात आली. ही आग शॉर्टसर्किटमुळे की अन्य कशामुळे लागली, याचा तपास सुरू असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी काळे यांनी दिली.

राडारोड्याने अडवली बचाव पथकांची वाट 
लेक सिटी मॉलमधील अग्निसुरक्षा बंद असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला संघर्ष करावा लागला; तर गेले काही दिवस मॉलच्या अंतर्गत डागडुजीसह वातानुकूलित डकचे काम सुरू असल्याने जागोजागी केबल्स विखुरलेल्या होत्या. त्यामुळे तोडफोड करून सर्व राडारोडा मॉलजवळच ढीग रचून ठेवलेला होता. त्यामुळे बचावकार्यासाठी आलेल्या अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाची वाहने आतपर्यंत पोहचू शकली नाहीत. त्यामुळे अखेर जेसीबी मागवून राडारोड्यातून मार्ग काढण्यात आला. 

यापूर्वीही मॉलला आग 
ऑगस्ट 2015 मध्ये कोरम मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील हॉटेलमध्ये आग 
जुलै 2016 मध्ये तीन हात नाका येथील इटर्निटी मॉलच्या चौथ्या मजल्यावर आग 

Fire at Lake City Mall in Thane

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com