कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीचा आरोग्यमंत्र्यांकडून आढावा, जाणून घ्या काय म्हणालेत आरोग्यमंत्री

दीपा कदम
Thursday, 5 November 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना केले. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून फिव्हर सर्व्हेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी यावेळी चर्चा झाली. ज्या रुग्णालयांमध्ये मृत्यू दर अधिक आहे त्याठिकाणी रुग्णालयस्तरावरच डेथ ऑडीटी कमिटी नेमून शासनाला अहवाल देण्याचे यावेळी तज्ञांनी संगितले.

महत्त्वाची बातमी : लोकहो आतापासून मनाची तयारी ठेवा, कोरोनामुळे यंदा मुंबईत फटाक्यांवर बंदी ?

५०० लॅबच्या माध्यमातून चाचण्यांवर अधिक भर

राज्यात कोरोनाची दुसरी लाट शक्यतो येणार नाही मात्र संभाव्य लाटेसाठी खबरदारीची उपाययोजना करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. सध्या राज्यात कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत त्यात खंड पडणार नसून त्याउलट अधिक प्रभावीपणे ५०० लॅबच्या माध्यमातून चाचण्यांवर अधिक भर दिला जाणार असल्याचे  टोपे यांनी सांगितले.

राज्यभरात फिव्हर सर्वेलन्स वाढविणार

थंडीमध्ये इन्फ्लुएन्झा सारखे आजार वाढतात. त्यामुळे तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून खासगी डॉक्टरांनी तापाच्या रुग्णांचे लक्षणानुसार तातडीने चाचण्या करण्यासाठी प्राधान्य देण्याचे समितीने सुचविले आहे. त्यानुसार राज्यभरात फिव्हर सर्वेलन्स वाढविणार असल्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितले.

महत्त्वाची बातमी : अर्णब गोस्वामी हा भाजपचा लाऊड स्पीकर, संजय राऊतांचा अमित शहांना टोला

‘सुपर स्प्रेडर’ यांच्या चाचण्यांवर भर

राज्यभरात किराणा दुकानदार, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, छोटे-मोठे व्यावसायिक, सार्वजनिक वाहतुकीतील कर्मचारी ज्यांचा लोकांशी कायम संपर्क येते अशा ‘सुपर स्प्रेडर’ यांच्या चाचण्यांवर भर देण्याचे निर्देश क्षेत्रिय पातळीवरील यंत्रणेला देण्यात आले आहेत.

डॉक्टर्स, नर्स यांना प्रशिक्षणाचा कार्यक्रम

लहान शहरांमधील रुग्णालयांमध्ये आयसीयूमधील डॉक्टर्स, नर्स यांची कमतरता लक्षात घेऊन तेथील कर्मचाऱ्यांना सिम्युलेशन लॅबच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेम्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय कायम

राज्यात सध्या कोरोनासाठी ज्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत तसेच जी सुविधा निर्माण करण्यात आली आहे ती कायम ठेऊन त्यात अजून वाढविण्यासाठी प्रयत्न करतानाच खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णयही कायम राहील. त्याचप्रमाणे टास्क फोर्सने जे आदर्श उपचार कार्यपद्धती तयारी करून दिली आहे त्यानुसार उपचार करण्याचे टोपे यांनी आवाहन केले आहे.

महत्त्वाची बातमी : अर्णब गोस्वामी: पहिल्यांदाच ११ वाजेपर्यंत सुरु होतं अलिबाग कोर्ट

आगामी दिवाळी सण लक्षात घेता नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंसिंग पाळावे, हात सातत्याने धुत रहावे या उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरे करण्याचे आवाहन आरोग्मयंत्र्यांनी केले आहे. महाराष्ट्र फटाकेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर मागणी करणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

या बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान डॉ. प्रदीप व्यास, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डेथ ऑडीट कमिटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे, राज्य साथरोग नियंत्रण तक्ष समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

( संपादन - सुमित बागुल )

Firecracker free Diwali should be celebrated in Maharashtra says rajesh tope


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Firecracker free Diwali should be celebrated in Maharashtra says rajesh tope