आरेतील संशयित बिबट्या जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

forest department Leopard caged in Mumbai Aarey Colony

आरेतील संशयित बिबट्या जेरबंद

मुंबई : बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आरे कॉलनीतील दीडवर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर आरेतील बिबट्यांवर ट्रॅप लावण्यात आला आहे. त्यात एका संशयित बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले असून हल्लेखोर बिबट्या हाच आहे का, याबाबत तपासणी सुरू आहे. याशिवाय आरे परिसरातील कॅमेरा ट्रॅपही वाढवले असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने दिली आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी (ता. २४ ) बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दीड वर्षीय इतिका लोट या मुलीचा मृत्यू झाला. यानंतर उद्यान प्रशासनाने ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावत हल्लेखोर बिबट्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथकही नेमले. मंगळवारी या पथकाला संशयित बिबट्याची धरपकड करण्यात यश आले असल्याचे माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभागाचे मुख्य वन संरक्षक, संचालक जी. मल्लिकार्जुन यांनी दिली.

जेरबंद केलेला बिबट्या हा संशयित असून त्याचे वय तीन वर्षे आहे. दीड वर्षीय मुलीवर हल्ला करणारा बिबट्या हाच आहे, हे सांगणे सध्या कठीण आहे. सध्या हा बिबट्या डॉक्टरांच्या निगराणीखाली असून त्याची तपासणी सुरू असल्याचे असल्याचे उद्यानाचे वन परिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे यांनी सांगितले.

अजूनही धोका कायम

बुधवारी जेरबंद झालेला तीन वर्षांचा नर बिबट्या सी-५५ आहे; तर सी-५६ हा बिबट्या अजूनही आरेतच फिरत असल्यामुळे अजूनही धोका कायम असल्याचे जी. मल्लिकार्जुन यांनी सांगितले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सी- ५५ या बिबट्याला आणल्यानंतर त्याची शारीरिक तपासणी केली गेली.