...तर आदिवासींचे कोरोनाने नव्हे, भूकबळीने मृत्यू होतील

File Photo
File Photo

विरार : लोकांनी सोशल डिस्टंन्सिंग ठेवावे, घरातच बसावे, या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचना आवश्‍यक आहेत, पण ज्यांच्या घरी धान्याचा साठा नाही, अशा आदिवासी-कातकरी लोकांच्या भूकेचा आक्रोश थांबवायचा कसा, असा प्रश्न करत आदिवासींच्या प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल न घेतल्यास पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी पाड्यांवर कोरोनाने नाही, तर भूकबळीने मृत्यू होतील, असा इशारा माजी आमदार विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

पंडित यांनी पालघर जिल्ह्यातील आदिवासी, कातकरी, रोजंदारीवर असलेले कामगार यांच्या परिस्थितीबद्दलचे पत्र उद्धव ठाकरे यांना पाठवून आदिवासींचा भूकबळी जाऊ नये, यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आवाहनही केले आहे. पंडित यांनी पत्रात पालघर जिल्ह्यातील आदिवासी, कातकरी आणि मजूरवर्ग यांची हलाखीची परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व लोकांच्या भुकेची काळजी मंत्रिमंडळातील कोणीतरी आधीच घ्यायला हवी होती, असे पंडित यांनी त्यात म्हटले आहे.

आदिवासी विभागाचे दुर्लक्ष! 
लॉकडाऊन काळात आदिवासींची जबाबदारी आदिवासी विभागाने याआधीच घ्यायला हवी होती. हे लोक हातावर पोट असणारे आहेत. अनेक दिवस उद्योगधंदे बंद असल्याने त्यांच्याही हाताला सध्या काम नाही. अशा वेळी त्यांनी पैसे खर्च करून धान्य कसे भरायचे, असेही पंडित यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील अनेक आदिवासी पाड्यांपर्यंत रेशनचे धान्य पोहोचलेले नाही. अपुऱ्या वाहतूक यंत्रणेअभावी गोदामातील धान्य पोहोचत नाही, अशा वेळी या आदिवासी लोकांनी पोटाची खळगी कशी भरायची, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

कोरोनाची चिघळती परिस्थिती लक्षात घेऊन आपण यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. मी माननीय मुख्यमंत्र्यांना तीन पत्रे पाठवली, पण अतिकामामुळे त्यांना कदाचित त्या पत्रांची दखल घेण्यास वेळ मिळाला नसावा, पण आता परिस्थिती हाताबाहेर चालल्याने अखेर हे अनावृत पत्र पाठवण्याचे पाऊल आपण उचलले आहे. 
- विवेक पंडित,
माजी आमदार 

Former MLA Vivek Pandit's letter to the Chief Minister

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com