अडचणीतील शेतकऱ्याला मदतीचा हात, केली तब्बल 10 टन द्राक्षांची विक्री

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

सध्याच्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. अशाच आर्थिक संकटात सापडलेल्या एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या मदतीला गोरेगाव शाळेचे मुख्याध्यापक धावून आले आहेत. आपला मित्र परिवार तसेच समाज माध्यमातून त्यांनी प्रसार केल्याने दक्षिण रायगडमध्ये या शेतकऱ्याने तब्बल दहा हजार किलो द्राक्षांची विक्री केली. त्यामुळे या शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळले आहे.

महाड : सध्याच्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. अशाच आर्थिक संकटात सापडलेल्या एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या मदतीला गोरेगाव शाळेचे मुख्याध्यापक धावून आले आहेत. आपला मित्र परिवार तसेच समाज माध्यमातून त्यांनी प्रसार केल्याने दक्षिण रायगडमध्ये या शेतकऱ्याने तब्बल दहा हजार किलो द्राक्षांची विक्री केली. त्यामुळे या शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळले आहे.

कोरोनामुळे अनेक व्यवसाय संकटात सापडले आहेत, तर शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री कुठे करायची, असा मोठा प्रश्न पडला आहे. त्यामुळे अनेकांची पिके शेतामध्येच सडत आहेत. अशाच संकटात सापडलेले सांगली जिल्ह्यातील पलूस येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी सुधीर पाटील हे देखील आपल्या द्राक्ष मालाची विक्री कशी करायची, या विवंचनेत असतानाच त्यांच्या मदतीला सांगलीतील परंतु सध्या रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील ना. म. जोशी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पवार हे धावून आले.

क्लिक करा : लॉकडाऊनचा कंटाळा आला म्हणून 15 कोटींच्या कंपनीचा मालक बनला डिलिव्हरी बॉय

राजेंद्र पवार यांनी आपला मित्र परिवार, शिक्षक वर्ग तसेच व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून या शेतकऱ्याला त्याची द्राक्षे विकत घेऊन आर्थिक मदत करावी, असे आवाहन केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी द्राक्षांची विक्री सुविधाही उपलब्ध केली. त्यानुसार त्यांनी रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, गोरेगाव, पाली, रोहा व कोलाड या ठिकाणी या शेतकऱ्याची द्राक्षे विक्री होतील, अशी व्यवस्थाही केली.

सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून द्राक्ष विक्रीसाठी प्रत्येकाला शेतकऱ्याचा संपर्क क्रमांक दिला. त्यामुळे द्राक्षाचे वाहन किती वाजता कोणत्या ठिकाणी येणार आहे, याची ग्राहकाला माहिती मिळाली. कोणत्याही प्रकारची गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून रायगड जिल्ह्यातील विविध गावांमध्ये तब्बल दहा हजार किलो द्राक्षांची विक्री केली.

पाच किलोसाठी केवळ दोनशे रुपये आकारून त्यांनी ग्राहकांनाही दिलासा दिला. आपत्तीच्या परिस्थितीमध्ये कोणतीही भाववाढ या शेतकऱ्याने न केल्याने त्यांची द्राक्षे सहज संपली. त्यात शिक्षकांनी सर्वाधिक खरेदी केली. 

क्लिक करा : मुंबईतील बुजुर्गांची होणार तपासणी 

राजेंद्र पवार सरांनी केलेल्या मदतीमुळेच आपले नुकसान टळू शकले. सर्वसामान्य माणसाने ठरवले तर तो शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा राहू शकतो हे त्यांनी दाखवून दिले.
-सुधीर पाटील, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A helping hand to a distressed farmer, sold 10 tons of grapes