#HopeOfLife : आशादायी ‘टाटा स्टोरी’

समीर सुर्वे
मंगळवार, 14 जानेवारी 2020

भारतात २०१८ मध्ये ११ लाख ५७ हजार नवीन कर्करोग रुग्णांची नोंद झाली; तर , परळच्या टाटा स्मारक रुग्णालयात त्याच वर्षी ७४ ते ७५ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली. म्हणजे देशातील साधारण ६ टक्के रुग्ण टाटा रुग्णालयात उपचार घेतात. एकूण चार ते पाच लाख रुग्णांवर दरवर्षी उपचार होतात. हे रुग्णालय उभारतानाच काळाच्या पुढचा विचार झाला होता. तो व्यवस्थापनाने अद्याप सोडलेला नाही. त्यामुळेच भविष्यातील गरज ओळखून अनेक नवे विभाग सुरू करण्यात आले. खारघर येथे रुग्णालय सुरू झाल्यानंतर आता परळ येथील रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हाफकिन संस्थेत रुग्णालयाचा विस्तार करण्यात येत आहे.

भारतात २०१८ मध्ये ११ लाख ५७ हजार नवीन कर्करोग रुग्णांची नोंद झाली; तर , परळच्या टाटा स्मारक रुग्णालयात त्याच वर्षी ७४ ते ७५ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली. म्हणजे देशातील साधारण ६ टक्के रुग्ण टाटा रुग्णालयात उपचार घेतात. एकूण चार ते पाच लाख रुग्णांवर दरवर्षी उपचार होतात. हे रुग्णालय उभारतानाच काळाच्या पुढचा विचार झाला होता. तो व्यवस्थापनाने अद्याप सोडलेला नाही. त्यामुळेच भविष्यातील गरज ओळखून अनेक नवे विभाग सुरू करण्यात आले. खारघर येथे रुग्णालय सुरू झाल्यानंतर आता परळ येथील रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हाफकिन संस्थेत रुग्णालयाचा विस्तार करण्यात येत आहे. ‘सकाळ’च्या ‘होप ऑफ लाईफ’ मोहिमेंतर्गत देशभरातील 
कर्करुग्णांसाठी संजीवनी ठरलेल्या टाटा रुग्णालयाच्या जन्मापासून आतापर्यंतचा प्रवास आणि भविष्याचा वेध...

भारत ज्या काळात क्षय, डांग्या खोकला, घटसर्प अशा आजारांशी लढत होता तेव्हा म्हणजे १९४१ मध्ये कर्करोगासाठीचे टाटा स्मारक रुग्णालय परळमध्ये उभे राहिले. त्या वर्षीच्या २८ फेब्रुवारीपासून रुग्णालयाचे कामकाज सुरू झाले. १९३१ मध्ये परदेशात उपचार घेऊनही लेडी मेहरबाई टाटा यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर भारतात कर्करोग रुग्णांची गरज ओळखून दोराब टाटा यांनी अशा रुग्णालयाचा विचार केला. मात्र, वर्षभरात त्यांचा मृत्यू झाला, पण त्यांनी पाहिलेले स्वप्न सर दोराब टाटा ट्रस्टच्या माध्यमातून १९४१ मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर प्रत्येक टप्प्यावर टाटा रुग्णालयाने भविष्याचा विचार करून अनेक बदल केले. १९६२ मध्ये भारतीय अणुविज्ञानाचे जनक होमी भाभा यांनी कर्करोग उपचारासाठी अणुविज्ञानाचे महत्त्व ओळखले. त्यांच्या पुढाकाराने भारताच्या अणुविज्ञान विभागाने हे रुग्णालय अधिपत्याखाली घेतले. त्यानंतर १९९२ आणि २००८ हे टाटा रुग्णालयाच्या वाटचालीचे महत्त्वाचे टप्पे मानले जातात.

मनसेच्या इंजिनात कोणाचं इंधन : बाळा नांदगावकर यांचं आणखी एक मोठं विधान

रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने नेहमीच काळाच्या पुढचा विचार केला. याबद्दल रुग्णालयाचे उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे सांगतात, ‘जगभरात कर्करोगावर शस्त्रक्रिया एकच डॉक्‍टर करायचा तेव्हा १९९२ मध्ये टाटामध्ये सुपरस्पेशालिटी शस्त्रक्रिया करणारे डॉक्‍टर तयार करण्यास सुरुवात केली. म्हणजे पोटातील अवयवांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी गॅस्ट्रोइंटेस्टीनल, स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यासाठी ब्रेस्ट सर्जन, लहान मुलांवर उपचार करण्यासाठी बालरोग तज्ज्ञ, तर मौखिक आणि घशाच्या कर्करोगासाठी उपचार करण्यासाठी त्याचा स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला. असे कर्करोगाच्या प्रकारानुसार विभाग तयार करण्यात आले. यामुळे डॉक्‍टर अधिक सक्षमपणे शस्त्रक्रिया करू शकतो. तसेच शस्त्रक्रियाही अधिक प्रभावी होते. रुग्णालय फक्त एवढ्यावरच थांबले नाही, तर अनेक वेळा कर्करोगामध्ये एकाच वेळी दोन प्रकारचे उपचार करावे लागतात. म्हणजे शस्त्रक्रिया आणि रेडिएशन किंवा शस्त्रक्रिया आणि केमोथेरपीही द्यावी लागते. अथवा केमोथेरपी आणि रेडिएशनही द्यावे लागते. यासाठीही २००८ मध्ये रुग्णालयात मल्टी डिसिप्लनरी केअर ऑफ कॅन्सरसाठी मेडिकल डिजीस मॅनेजमेंट ग्रुप तयार करण्यात आला. यात जठराचा, स्वादुपिंडाचा कर्करोग असेल तर त्या संबंधीचे सर्जन, मेडिसीन, रेडिएशन कर्करोगतज्ज्ञ, तसेच आहारतज्ज्ञ असे प्रत्येक अवयवानुसार तज्ज्ञांची टिम तयार करण्यात आली. ही टिम एकत्र चर्चा करून उपचारांबाबत अंतिम निर्णय घेते. हा काळाच्या पुढचा विचार मानावा लागेल. असे ते नमूद करतात. अशा अनेक गोष्टींमुळेच टाटा स्मारक रुग्णालयाची स्पर्धा ही जागतिक स्तरावर आहे.’
भारतात टाटासारखे एकमेव रुग्णालय आहे. त्यामुळेच रुग्णालयावर प्रचंड ताण आहे. त्यामुळे आता देशभरात टाटाचा विस्तार करण्यास सुरुवात झाली असल्याचे डॉ. श्रीखंडे सांगतात. नवी मुंबईतील खारघरमध्ये टाटाचा विस्तार करण्यात आला. पंजाब येथील संगरुलमध्ये राज्य सरकारच्या मदतीने होमीभाभा कर्करोग रुग्णालय सुरू झाले आहे. मुलानपूर येथेही रुग्णालय उभारण्यात येत आहे. वाराणसी येथेही दोन रुग्णालये उभारण्यात येत आहेत. वाराणसी येथील पंडित मदनमोहन मालवीया रुग्णालय सुरू झाले आहे. विशाखापट्टणम येथील रुग्णालयाचा काही भाग सुरू झाला आहे.

हेही वाचा ः दारूसाठी तरुण चढला थेट खांबावर

गुवाहटीमध्ये डॉ. बी. बरुआ कॅन्सर रुग्णायलही टाटाने टेकओव्हर केले आहे. अशा पद्धतीने कर्करोगाच्या उपचारासाठी टाटाचा पसारा देशभरात वाढवला जातोय. टाटा रुग्णालयात महाराष्ट्रातून ३९ टक्के आणि राज्यबाहेरून ६१ टक्के रुग्ण उपचारासाठी येतात. राज्याच्या बाहेरून येणाऱ्या रुग्णांमध्ये दक्षिण भारतातून येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे, तर उत्तर आणि ईशान्य भारतातून येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. यात उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, पंजाब यानंतर ओरिसा आणि बंगाल या भागातून सर्वाधिक रुग्ण येतात. त्याचबरोबर राज्यस्थान, गुजरातमधूनही रुग्ण येतात. दक्षिण भारतात वैद्यकीय सुविधा चांगल्या असल्याने तेथून येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे उत्तर भारतात टाटाच्या धर्तीवर कर्करोगाची रुग्णालये उभारण्याची गरज ओळखून ही पावले उचलण्यात आली असल्याचे डॉ. श्रीखंडे यांनी सांगितले. यात फक्त टाटा स्मारक रुग्णालयावर येणारा ताण कमी करणे हा हेतू नाही, तर रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचार मिळणे हाही हेतू आहे, असेही त्यांनी नमूद केले.

बाजारात आलाय बाहुबली कांदा. एका कांद्याचं वजन....

भारतात कर्करोगातील तज्ज्ञ डॉक्‍टरांची संख्या प्रचंड कमी आहे. त्याबद्दल डॉ. शैलेश श्रीखंडे सांगतात, भारतात २ ते ३ हजार रुग्णांसाठी एक डॉक्‍टर आहे. अमेरिकेत हे प्रमाण ३९० रुग्णांसाठी एक डॉक्‍टर एवढे आहे. त्यामुळे येत्या 
काही वर्षांत डॉक्‍टरांची संख्या वाढणे गरजेचे आहे. देशात एका बाजूला सुपरस्पेशालिस्ट सर्जनची गरज आहे, त्याचबरोबर निमशहरी आणि जिल्ह्यांच्या ठिकाणी उपचार करण्यासाठी जनरल सर्जनची गरज असल्याचे डॉ. श्रीखंडे यांनी सांगितले. त्यासाठी सर्जरीमध्ये पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर तीन ते पाच वर्षांचा अभ्यासक्रम टाटा स्मारक रुग्णालयात चालवला जातो. त्यात पूर्वी १६ डॉक्‍टरांची निवड होत होती. आता २४ डॉक्‍टरांची निवड होते. यातून देशातील डॉक्‍टरांची गरज पूर्ण करणे हा 
हेतू आहे.

रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधेबद्दल डॉ. श्रीखंडे सांगतात, ६० टक्के रुग्णांना अणुविज्ञान विभागामार्फत सवलतीच्या दरात उपचार होतात. सवलतीच्या दरात म्हणजे जे उपचार बाहेर १० ते १५ लाखांत होतात ते टाटामध्ये दीड ते दोन लाखांत होतात. तसेच, त्यांच्यासाठी लागणाऱ्या औषधांमध्येही टाटा रुग्णालय कोणताही फायदा घेत नाही. एवढेच नाही तर औषध पुरविणाऱ्या कंपन्यांबरोबर वाटाघाटी करून कमी दरात औषधे रुग्णांना उपलब्ध करून देतो. टाटावर रुग्णांचा प्रचंड विश्‍वास आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीही आहे. त्यावर उपाय म्हणून रुग्णालयाचा विस्तार इतर राज्यांत करण्यात येत आहे. टाटा स्मारक रुग्णालयासारखेच उपचार देशातील अनेक भागांत देण्याचा आमचा विचार आहे, असेही डॉ. श्रीखंडे यांनी सांगितले.

सप्टेंबर २०२० ला ‘हेड्रॉन बिम’ने उपचार
कर्करोगावर अधिक प्रभावी, थेट उपचारासाठी ‘हेड्रॉन बिम’चा वापर करण्यात येणार आहे. खारघरमध्ये सप्टेंबरपासून हे उपचार सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यातून लहान मुलांवर तसेच ब्रेन ट्यूमरच्या उपचारासाठी मदत होणार आहे. या यंत्रणेमुळे थेट कर्करोग असलेल्या भागावर क्ष-किरणाचा मारा अधिक सक्षमपणे करता येईल.

पाच वर्षांत दोन हजार बेड्‌स
सध्या परळ येथील कर्करोग रुग्णालयात रुग्णांसाठी ५८० बेड्‌स उपलब्ध आहेत. मात्र, देशात सेवेचा विस्तार करताना मुंबई, नवी मुंबईतही टाटा रुग्णालयाच्या सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. हाफकिन संस्था ५८० खाटांचे रुग्णालय बांधणार आहे. खारघरला नवीन कामे सुरू आहेत. पुढच्या पाच-सहा वर्षांत मुंबई, नवी मुंबई मिळून दोन हजार बेड्‌स रुग्णांना उपलब्ध होतील.

गरजूंसाठी धर्मशाळा
देशभरातून हजारो रुग्ण रोज टाटा रुग्णालयात उपचारासाठी येतात. ते रस्त्यावरच राहातात. अशांसाठी टाटा स्मारक केंद्रामार्फत हाफकिन संस्थेत धर्मशाळा बांधण्यात येत आहे. यात फक्त गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनाच राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

 

टाटा स्मारक केंद्राने नेहमीच काळाच्या पुढचा विचार केला आहे. ती रुग्णालयाची स्थापना असो अथवा उपचारांसाठी वापरण्यात आलेली आधुनिक उपचार पद्धती, प्रत्येक बाबतीत रुग्णालय नेहमीच काळाच्या पुढे असते. देशभरातून रुग्ण येत असतात. त्यांच्या गरजांचा विचार करून संगणकीय नोंदणी सुरू केली. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात राहाणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय अहवाल मिळवण्यासाठी मुंबईत थांबण्याची गरज राहिलेली नाही. ते त्यांच्या गावातूनही ऑनलाईन त्यांचे अहवाल पाहू शकतात. ‘हेड्रॉन बिम’ या तंत्रामुळे कर्करोगावर अधिक प्रभावी उपचार करता येणार आहेत. टाटा रुग्णालय फक्त उपचार करण्याचा विचार करत नाही तर देशाची गरज ओळखून नवे तज्ज्ञ तयार करण्यावरही भर देत आहे.
- डॉ. शैलेश श्रीखंडे, उपसंचालक, टाटा स्मारक रुग्णालय, विभागप्रमुख सर्जरी आणि गॅस्ट्रो इंटेस्टीनल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hopeoflife Tata's inspiring story