....म्हणून काढला प्रेयसीने 'त्याचा' काटा!

....म्हणून काढला प्रेयसीने 'त्याचा' काटा!
....म्हणून काढला प्रेयसीने 'त्याचा' काटा!

नवी मुंबई : गाढी नदीच्या पात्रात 9 डिसेंबर रोजी काळ्या रंगाच्या बॅगेमध्ये आढळून आलेल्या मृत व्यक्तीच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले आहे. या हत्या प्रकरणातील मृत व्यक्तीची अंगठी व कपड्यावरून पोलिसांनी मृत इम्रान फहीमुद्दीन खान (20) याची ओळख पटवली; तसेच त्याची हत्या करणाऱ्या त्याच्या प्रेयसीसह तिच्या पतीला अटक केली आहे. 

या घटनेतील मृत इम्रान खान हा मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील असून त्याचे आपल्या गावातील लालता प्रसाद याच्या 23 वर्षीय पत्नीसोबत प्रेमसंबध होते. त्यामुळे इम्रान खानने चार महिन्यांपूर्वी लालता प्रसादच्या पत्नीसोबत कोर्टात विवाह केला होता. त्यानंतर लालता प्रसादची पत्नी आपल्या दोन लहान मुलींसोबत मुंबईत पळून आली होती. दोघेही पनवेल तालुक्‍यातील हरिग्राम गावात राहत होते; मात्र दोघांच्यात वारंवार वाद होत होते. त्यामुळे प्रेयसीने पहिला पती लालता प्रसाद याला सांगून इम्रानच्या तावडीतुन सुटका करण्यास सांगितले. 

त्यानुसार गत डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला लालता प्रसाद हरिग्राम येथे इम्रान व त्याची पत्नी राहत असलेल्या घरी आला होता. त्यानंतर लालता प्रसाद याने पत्नीच्या मदतीने इम्रानची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने इम्रानचा मृतदेह बॅगेत भरून सदरची बॅग गाढी नदीपात्रात टाकून तो पत्नीसह उत्तर प्रदेश येथे पळून गेला होता. दरम्यान, 9 डिसेंबर रोजी गाढी नदीच्या पात्रात इम्रानचा पूर्णपणे सडलेल्या अवस्थेतील मृतदेह बॅगेमध्ये आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पनवेल तालुका पोलिसांनी मृताच्या अंगावरील कपडे व हातातील अंगठी याचा आधार घेत मृत इम्रान खान याची ओळख पटविली. 

उत्तर प्रदेशमधून आरोपींना पकडले 
त्यानंतर पोलिसांनी आरोपी लालता प्रसाद याचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय खेडकर, पोलिस उपनिरीक्षक सुनील गुरव यांचे पथक उत्तर प्रदेश येथे पाठविले होते. आरोपी लालता प्रसाद याचे गाव नेपाळ बॉर्डला लागून असल्याने तो नेपाळ येथे पळून जाण्याची शक्‍यता होती. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने दहा दिवस त्या परिसरात थांबून परिसराची माहिती काढली. त्यानंतर उत्तर प्रदेश एसटीएफ विभागाच्या मदतीने सापळा रचून आरोपी लालता प्रसाद (32) याला अटक केली. त्यानंतर त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेऊन तिलादेखील अटक करण्यात आल्याची माहिती पनवेलचे सहायक पोलिस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com