केरळ सरकारनं उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला, राज्याला केली मदत

केरळ सरकारनं उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला, राज्याला केली मदत

मुंबई- देशासह राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. देशातील सर्वच राज्य कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाला संसर्ग कमी करण्यासाठी देशातील सर्वच राज्य सरकार आपआपल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राची स्थिती पाहता कोरोनाचा सर्वाधिक प्रार्दुभाव हा महाराष्ट्रात झालेला दिसतोय. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. त्यामुळे राज्य सरकारनं केरळ सरकारला एक पाठवलं होतं. या पत्रात महाराष्ट्र सरकारनं केरळ सरकारकडे वैद्यकीय मदत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता केरळ सरकारनं मुख्यमंत्र्यांची मागणी पूर्ण केली आहे. 

कोविड-19 विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी महाराष्ट्रात केरळहून 50 डॉक्टर आणि 100  नर्सेचं पथक मुंबईत दाखल झालं आहे. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर केरळ सरकारनं कोविड -19 विरूद्धच्या लढाईत प्रयत्नांना बळकटी मिळवण्यासाठी  एक टीम पाठवली आहे. सध्या अंधेरीतलं सेव्हन हिल्स रुग्णालयात कोविड-19 च्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. पालिकेनं हे रुग्णालय कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ताब्यात घेतलं आहे. या रुग्णालयात आता केरळहून आलेले डॉक्टर आणि नर्सेस काम करतील.

मुंबईला अधिक वैद्यकीय कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे. सोमवारी केरळमधील 16 डॉक्टरांची टीम मुंबईत दाखल होणार आहेत. तसंच याआधी दोन डॉक्टर मुंबईत दाखल झाले असल्याचं तिरुअनंतपुरम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधीक्षक डॉ. संतोष कुमार यांनी सांगितले.

आम्ही सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये काम करू. मुंबईतील वैद्यकीय कर्मचार्‍यांना मदत करण्यासाठी येणारे सर्व डॉक्टर खासगी क्षेत्रातील (केरळ) काम करताहेत आणि हे सर्व डॉक्टर्स आपल्या सदस्यांना मदत करण्यासाठी स्वेच्छेनं येथे काम करण्यास आले असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्र सरकारनं पाठवलं होतं पत्र 

वैद्यकीय शिक्षण विभागाकडून या संदर्भातलं पत्र केरळ सरकारला पाठवण्यात आलं होतं. महाराष्‍ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगानं वाढत आहे. मुंबई आणि पुण्यात भविष्‍यातही कोरोनाचे नवे रुग्ण समोर येण्याची शक्यता आहे.  त्यामुळे सध्याची राज्यातील रुग्णालयातील स्थिती पाहता आम्हाला अधिक अनुभवी डॉक्टर तसेच नर्सची गरज आहे. सध्या खासगी डॉक्टरही काम करत आहेत. त्यामुळे आम्हाला अतिरिक्त नर्स तसेच डॉक्टरांची गरज असल्याचं पत्रात म्हटलं होतं. 

राज्य सरकार देणार वेतन

या तात्पुरत्या रुग्णालयाची जबाबदारी केरळचे डॉक्टर आणि परिचारिका सांभाळणार आहेत. स्पेशालिस्ट डॉक्टरांना म्हणजेच एमडी अथवा एमएस डाक्टरांना महिन्याला दोन लाख रूपये, एमबीबीएस डॉक्टरांना 80 हजार रूपये आणि नर्सना 30 हजार रूपये मासिक वेतन दिलं जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सध्या रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ही परिस्थिती पाहता आम्हाला अधिकच्या डॉक्टर तसंच नर्सची आवश्यकता भासण्याची शक्यता असल्याचं सरकारच्या मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चचे डायरेक्टर आणि कोविड 19चे नोडल ऑफिसर डॉ. टी पी लहाने म्हणाले होते. तसंच याबाबतच आम्ही केरळमधील डॉक्टरांशी चर्चा केली असून केरळने आम्हाला मदत देऊ केली आहे. आम्ही त्यासाठी अधिकृत पत्रही पाठवले असल्याचं लहाने यांनी सांगितलं होतं.

लहाने यांनी केरळचे आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांना लिहिलेल्या पत्रात तज्ज्ञ डॉक्टर आणि परिचारिकांना मुंबईच्या महालक्ष्मी रेस कोर्समध्ये स्थापित असलेल्या 600  खाटांचं कोविड -19 केंद्र व्यवस्थापित करण्याची विनंती केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com