कामगार गावाला गेल्याने कारखानदार चिंतेत; वसईतील कारखान्यांमध्ये कामगारांचा तुटवडा

प्रसाद जोशी
Tuesday, 26 May 2020

वसईच्या औद्योगिक वसाहतीतील काही कारखाने सुरू झाले असले तरी मात्र मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे कामे जलद कशी होणार, हा प्रश्न कारखानदाराना भेडसावत आहे.

वसई : वसईच्या औद्योगिक वसाहतीतील काही कारखाने सुरू झाले असले तरी मात्र मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे कामे जलद कशी होणार, हा प्रश्न कारखानदाराना भेडसावत आहे. लॉकडाऊनच्या काळात उपासमार होत असल्याने मजूर आपापल्या राज्यात परतले. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्याने कारखाना मालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

मोठी बातमी ः महाराष्ट्रात पुन्हा येणार मोठा राजकीय भूकंप ? शरद पवारांची मातोश्रीवर हजेरी, दीड तास चर्चा...

कोरोना विषाणू डोके वर काढत आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना परराज्यातील मजुरांत घबराट निर्माण झाली व जो मार्ग मिळेल त्या मार्गाने मूळगावी परतण्यासाठी त्यांनी धडपड सुरु केली. वसई-विरार महापालिका हद्दीत देखील हीच परिस्थिती आहे. ओरिसा, उत्तरप्रदेश, कर्नाटक, बिहार , झारखंड भागातील मजूर गावाकडे गेले आहेत. औद्योगिक वसाहतीत कारखान्यांना नियम ठरवून काम करण्याची सूट देण्यात आली. सध्या लॉकडाऊन-4 सुरू आहे. त्यात परराज्यात गेलेले मजूर हे लवकर येणार नाहीत. त्यामुळे उत्पादन घेताना मजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने कारखानदारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. 

मोठी बातमी ः संजय राऊतांचं खळबळजनक ट्विट, महाराष्ट्रातील सरकारबाबत केलं 'मोठं' भाष्य...

वसईला मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे. ज्याठिकाणी 25 ते 30 कामगार होते त्यांची संख्या कमालीची घटली आहे. केवळ 4 ते 5 कामगार उपलब्ध आहेत, त्यापैकी देखील गावाकडे जाण्याचा विचार करत आहेत. वसई इंडस्ट्रियल कंपनी चालक संतोष घाटे यांनी सांगितले की, परवानगी मिळाल्याने कंपनी सुरू केली, परंतु मशीन, पॅकेजिंग व अन्य काम करण्यासाठी कामगारच नाहीत. त्यामुळे कामावर परिणाम झाला आहे. कारखान्यातील 90 टक्के कामगार आपल्या मूळगावी गेले आहेत. कोरोनाच्या भीतीने त्यांनी गावाला जाण्यासाठी प्राधान्य दिले. कामगार पुन्हा केव्हा येथील हे निश्चित नाही. तोवर नुकसानीलाच सामोरे जावे लागेल असे कारखानदारांचे म्हणणे आहे.

हे वाचा ः पावसाळ्याचे वेध लागले हो..! कर्नाळा अभयारण्यात तिबोटी खंड्याचे घडले दर्शन...

 

कंपनी सुरू केली मात्र कामगारांची संख्या फारच कमी आहे. त्यातच कोलकाता येथील कामगार देखील कोरोनाच्या भीतीपोटी निघून गेले. नवीन कामगारांच्या शोधात आहोत, त्यासाठी अनेकांना विचारपूस केली असता गावी जाणार असल्याचे सांगण्यात आले. कामगार नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. 
- पंकज बुरांडे, कारखानदार,  वालीव (वसई पूर्व)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: as labours migrated to their home state, industrilist worried for labour