'त्या' आरोपींना तुरुंगात न घेतल्याने तळोजा तुरुंग अधीक्षकांची न्यायालयाकडून कानउघाडणी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

बोरिवली येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी गत आठवड्यात मुंबईतील गोरेगाव येथील बांगूरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका आरोपीची तळोजा तुरुंगात रवानगी केली होती.

नवी मुंबई : न्यायालयाने तळोजा तुरुंगात पाठविलेल्या आरोपींची कोविड-19 चाचणी केल्याशिवाय तुरुंगात घेण्यास नकार देणाऱ्या व त्यासंदर्भात न्यायालयाला पत्र पाठवून सूचना करणाऱ्या तुरुंग अधीक्षकांना न्यायालयाने खरमरीत पत्र लिहून कानउघाडणी केली. असे कृत्य पुन्हा केल्यास उच्च न्यायालयात फौजदारी खटला चालविण्यात येईल, असा इशारा न्यायालयाने दिला आहे.  

महत्वाची बातमी चिंता वाढली, आता मानखुर्दच्या मंडाळा झोपडपट्टीमध्येही कोरोनाचा शिरकाव

बोरिवली येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी गत आठवड्यात मुंबईतील गोरेगाव येथील बांगूरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका आरोपीची तळोजा तुरुंगात रवानगी केली होती; मात्र तळोजा तुरुंग प्रशासनाने आरोपीला तुरुंगात न घेता त्याची जेजे रुग्णालयातून कोविड-19 तपासणी केल्यानंतरच तुरुंगात घेणार असल्याचे सांगून आरोपीला पोलिसांसोबत परत पाठवून दिले होते. आरोपीच्या तपासणीत त्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोक्सोच्या गुह्यातील आरोपीलादेखील तपासणीशिवाय तुरुंगात घेण्यास अधीक्षकांनी नकार दिला होता. त्यानंतर तळोजा तुरुंग अधीक्षकांनी आरोपींची तपासणी केल्यानंतरच तुरुंगात पाठविण्यात यावे, अशी सूचना करणारे पत्र न्यायालयाला पाठविले होते.  त्यामुळे मुख्य न्याय दंडाधिकारी ठाणे यांनी तळोजा अधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर यांना खरमरीत पत्र लिहून त्यांची कानउघाडणी केली.

मोठी बातमी : गुड न्यूज! प्लाझ्मा थेरपीचा मार्ग मोकळा...नमुन्यांची तपासणी अँटीबॉडीजसाठी सकारात्मक

अधीक्षकांनी न्यायालयाने जारी केलेल्या तुरुंग वॉरंटच्या अनुषंगाने आरोपीला प्रथम तुरुंगात प्रवेश देणे आवश्यक आहे. त्यानंतर आरोपीला कोणत्या वैद्यकीय चाचणीची अथवा उपचाराची गरज आहे, याची माहिती घेऊन त्याला सरकारी रुग्णालयात पाठविणे हे अधीक्षकाचे कर्तव्य असल्याचे न्यायालयाने आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे. आपण कायद्याची योग्य कार्यपद्धती न वापरता उलट आरोपींची वैद्यकीय चाचणी घेण्यासाठी अयोग्यरीत्या न्यायालयास पत्र पाठविल्याचे न्यायालयाने पत्रात म्हटले आहे. तरुंगातील आरोपींना नकार देण्याची ही घटना भविष्यात पुन्हा घडल्यास आपल्याविरुद्ध उच्च न्यायालयात फौजदारी खटला चालवून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा न्यायाधीशांनी पत्राद्वारे दिला आहे.  

नक्की वाचा १२ तास ड्युटी आणि २४ तास आराम; पोलिसांना पाळावे लागणार 'हे' नवीन नियम

कुठल्याही आरोपीला तुरुंगात घेण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी होणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत एकामुळे अन्य कैद्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यात नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोना चाचणी महत्त्वाची आहे. त्यामुळे कैद्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्या आरोपींची तपासणी झाली नाही, अशा दोन आरोपींना परत पाठविण्यात आले. त्यातील एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत आपली भूमिका न्यायालयापुढे स्पष्ट करणार आहोत.  
- कौस्तूभ कुर्लेकर, 
अधीक्षक, तळोजा मध्यवर्ती कारागृह

letter from court to Taloja jail superintendent's, accused should not be taken to jail  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: letter from court to Taloja jail superintendent's, accused should not be taken to jail