मुख्यमंत्र्यांची डरकाळी; 'आता रडायचं नाय,कर्नाटकचा भाग महाराष्ट्रात आणणार' 

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 27 January 2021

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि संकल्प” पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.  

मुंबई - कर्नाटक सीमा प्रश्न त्यावरुन सातत्यानं होणारे वाद यामुळे गेल्या काही दिवसांपासुन वातावरण पेटले आहे. त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले आहे. त्यांनी आपल्या भाषणातून तसा निर्धार व्यक्त केला आहे.  कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच. असे त्यांनी सांगितले आहे.

यापुढे  मला आता नुसत्या रडकथा नकोत, तर जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल पडलं पाहिजे, या शब्दांत ठाकरे यांनी आपला मनोदय व्यक्त केला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि संकल्प” पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. नव्या पिढीली महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाची माहिती या पुस्तकातून  देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंनी सीमावादावर केलेल्या आंदोलनाची आठवण सांगितली. सीमाभागासंबंधी निवेदन देण्यासाठी मोरारजी देसाई यांच्या ताफ्यासमोर झालेलं आंदोलन आणि त्यानंतर झालेला घटनाक्रम उद्धव ठाकरे यांनी उलगडला.

 महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महत्त्वाची बैठक

त्यावेळच्या आठवणींना उजाळा देताना उध्दव ठाकरे म्हणाले, आम्ही तेव्हा कलानगरला राहत होतो. दादरला शिवाजी पार्कला जिथे घर होतं तिथे मार्मिकची कचेरी होती. मी सात-आठ वर्षांचा होतो. गोळीबार, लाठीमार झाल्याचे फोन यायचे. पंढरीनाथ सावंत अश्रूधुराच्या रिकाम्या नळकांड्या घेऊन आले होते.  बाळासाहेबांनी आमची बॅग भरुन ठेवा, असे सांगितले. उद्या बहुतेक सुर्योदयाच्या आधी आमची उलचबांगडी होणार सांगितलं आणि तसंच झालं. ही आठवण उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितली.

महत्त्वाची बातमी :  कुणाला काय वाटेल याची पर्वा न करता जेंव्हा शिवसेनेचा खासदार भाजप आमदाराने आयोजित कार्यक्रमात लावतो थेट हजेरी

पुढची 10  दिवस मुंबई धगधगत होती. आज आपल्याला तशीच धग पुन्हा जागवायची आहे, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. हा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. तुम्ही महाराष्ट्रातच आहात. कर्नाटक सरकार उर्मटपणाने एक एक पाऊल टाकत आहे. एखादं प्रकरण कोर्टात गेल्यानंतर काही करायचं नसतं, तो कोर्टाचा अपमान ठरतो. पण तरीही बेळगावचं नामांतर करण्यात आलं. त्याला उपराजधानी केली गेली. विधीमंडळाचं अधिवेशन केलं जातं. हा न्यायालयाचा अपमान नाही का? असा प्रश्न उपस्थित केला.  

महत्त्वाची बातमी : "स्वतःचे दामन रक्ताने लादले असणाऱ्यांनी दुसऱ्यांवर आरोप करूच नये"आशिष शेलार यांचे राऊत पवारांवर थेट आरोप
 आपण ज्याप्रकारे कायद्याचा विचार करतो तसं कर्नाटक सरकार करत नाही. हा विषय केवळ तेवढ्यापुरता बोलण्याचा नाही. कर्नाटकमध्ये कोणत्याही पक्षाचं सरकार असो, कोणीही मुख्यमंत्री असो. मराठी लोकांवर अत्याचार करायचा यावर त्याचं दुमत नसतं. त्याचप्रमाणे हा भूभाग जो कर्नाटकव्याप्त आहे तो माझ्या राज्यात आणणारच असं एकत्रितपणे लढलो तर हा प्रश्न सुटेल, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra cm uddhav thackeray commented on karnataka belgaon border issue