राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची तयारी; गृह खात्याला दिला अहवाल

टीम ई-सकाळ
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

आज सकाळीच महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी राज्यपाल कोशियारी यांची राजभवानात जाऊन राज्यपालांची भेट घेतली.

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा गुंता सुटलेला नाही. त्यामुळं राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्याचं माहिती मिळाली आहे. राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांची मुदत रात्री साडे आठ वाजता संपत आहे. त्यापूर्वीच राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे. या संदर्भात डीडी न्यूज या सरकारी वृत्तवाहिनीने ही याबाबतची बातमी टेलिकास्ट केलीय. 

मी ठणठणीत त्याच आवेशाने परत येणार : संजय राऊत

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचे 'हे' असतील पर्याय

रात्री साडे आठपर्यंतची मुदत 
आज सकाळीच महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी राज्यपाल कोशियारी यांची राजभवानात जाऊन राज्यपालांची भेट घेतली.  एका खासगी गाडीतून कुंभकोणी राजभनात दाखल झाले. त्यानंतर कुंभकोणी राज्यपाल यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. राष्ट्रपती राजवट लागू करण्या संदर्भातील कायदेशीर बाबींवर चर्चा झाली. आज, सायंकाळपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यात असमर्थता दर्शवली तर, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. या संदर्भात केंद्रीय गृहखात्याला अहवालही पाठवण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझील दौऱ्यावर जाणार असून, तत्पूर्वी या संदर्भात निर्णय होण्याची अपेक्षा असताना. आज, मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

काँग्रेसची टीका
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर ट्विटरद्वारे टीका केली  आहे. तर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही राज्यपालंच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केलीय. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसलाही निमंत्रित करायला हवं होतं, असं चव्हाण म्हणाले आहेत. 

शिवसेना आव्हान देणार
राज्यपाला भगतसिंग कोशियारी यांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपला 48 तासांची मुदत दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करण्यात आलं. पण, त्यांना केवळ 24 तासांची मुदत देण्यात आली. यावरून शिवसेना नाराज होती. शिवसेनेनं बहुमताची गोळाबेरीज करण्यासाठी आणखी वेळ मागितला होता. पण, राज्यपालांनी शिवसेनेला मुदतवाढ न देता राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले. शिवसेनेनं कालच या विरोधात कोर्टात दाद मागण्याची घोषणा केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Governor recommends President's rule in state