महाराष्ट्र पोलिस, ठाणे पालिका संघ विजयी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुरुष गटातून महाराष्ट्र पोलिस संघ; तर महिला गटात ठाणे महापालिकेच्या संघाने विजेतेपद पटकाविले. महापालिकेच्या वतीने विजेत्या पुरुष व महिला संघाला प्रत्येकी एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

ठाणे : ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुरुष गटातून महाराष्ट्र पोलिस संघ; तर महिला गटात ठाणे महापालिकेच्या संघाने विजेतेपद पटकाविले. महापालिकेच्या वतीने विजेत्या पुरुष व महिला संघाला प्रत्येकी एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आदी या वेळी उपस्थित होते. या स्पर्धेच्या निमित्ताने गेले चार दिवस ठाणेकरांना कबड्डीचा थरार अनुभवायला मिळाला. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपली उपस्थिती लावून या स्पर्धेचा आनंद लुटला व स्पर्धकांना प्रोत्साहित केले. 

ठाण्यातील पार्किंग प्लाझामुळे मध्य रेल्वे कोट्यधीश

व्यावसायिक पुरुष संघात द्वितीय पारितोषिक एअर इंडिया संघाने पटकाविले असून त्याला रोख रक्कम 75 हजार रुपये, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. उपउपान्त्य फेरीतील विजेतेपद महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, भारत पेट्रोलियम यांनी पटकाविले असून त्यांना रोख रक्कम 30 हजार, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

मालिकेत एअर इंडिया संघातील उमेश म्हात्रे यांना उत्कृष्ट खेळाडू, महाराष्ट्र पोलिस संघातील बाजीराव घोडके यांनी उत्कृष्ट पकडीचे पारितोषिक पटकाविले. मालिकेत उदयोन्मुख खेळाडूचा किताब ठाणे महापालिका संघातील अक्षय भोईर यांनी, तर मालिकावीर म्हणून महाराष्ट्र पोलिस संघातील नितीन थळे यांना रोख रक्कम 21 हजार रुपये पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. 

महिला व्यावसायिक गटात द्वितीय पारितोषिक बॅंक ऑफ बडोदाने पटकाविले असून या संघाला रोख रक्कम 75 हजार रुपये, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. उपउपान्त्य फेरीत एमरल्ड द इन्फ्रास्ट्रक्‍चर व बालवडकर पाटील वेंचर्स विजयी ठरले. या दोन्ही संघांना रोख रक्कम 30 हजार, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या उत्पन्नात घसघशीत वाढ

उत्कृष्ट पकडीचा किताब बॅंक ऑफ बडोदाच्या साक्षी रहाटे यांनी पटकाविला. मालिकेत उदयोन्मुख खेळाडूचा किताब लेयर टेक्‍नॉलॉजी संघातील ज्योती पवार यांनी; तर मालिकावीराचा किताब ठाणे पालिका संघातील कोमल देवकर यांनी पटकाविला. त्यांना 21 हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. 

महिला संघाचा विशेष सत्कार 
ठाणे महापालिकेच्या महिला संघाने प्रथमच या स्पर्धेत सहभागी होत विजेतेपद पटकावून पालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या महिला संघाला महापौर नरेश म्हस्के यांनी 25 हजारांचे, उपमहापौर पल्लवी कदम यांनी 11 हजारांचे; तर सभागृह नेते अशोक वैती व शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे यांनी संयुक्तरीत्या 21 हजारांचे विशेष पारितोषिक देऊन सन्मानित केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Police, Thane Municipality team won