भीषण ! कोविड नसलेल्या रुग्णांवर पॉझिटिव्ह म्हणून केले उपचार, अखेर जीव गेला आणि...

भीषण ! कोविड नसलेल्या रुग्णांवर पॉझिटिव्ह म्हणून केले उपचार, अखेर जीव गेला आणि...

मुंबई : माहीममधील फॅमिली केअर रुग्णालयामध्ये एका रुग्णावर कोविड पॉझिटिव्ह नसताना देखील कोविडचे उपचार करण्यात आले. या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून रुग्णांच्या नातेवाइकांची आपल्या रुग्णाचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाला असून रुग्णालयाने आपली आर्थिक पिळवणूक केल्याचा आरोप केला आहे. शुक्रवारी सकाळी या रुग्णालयात उपचारासाठी दाखल असणाऱ्या इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील या रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर आणला आहे. माहीममध्ये फॅमिली केअर सेंटर हे रुग्णालय असून सध्या हे कोविड सेंटर करण्यात आलेले आहे. या रुग्णालयात 32 रुग्णांना ऍडमिट करण्याची सुविधा आहे.

केसतोडीवर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल : 

माहीम कोळीवाडा इथला प्रशांत काळे हा तरुण 25 जुलैला तिथल्या एका स्थानिक रुग्णालयात केसतोडीवर उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता. यावेळी फॅमिली केअर सेंटर रुग्णालयातील डॉक्टर किरण पाटील हे या रुग्णालयात आले होते. त्यानी रुग्णाला कोरोनाची लक्षणे दिसत असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांना सांगितलं. त्यांना तातडीने आपल्या रुग्णालयात म्हणजेच फॅमिली केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करा असा सल्लाही त्यांनी दिला होता. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी घाबरून तातडीने या सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. हा रुग्ण केवळ दहा तास या सेंटर मध्ये उपचार घेत होता. यावेळी डॉक्टर्स आणि तिथल्या स्टाफने त्यांना कोविड झाला असून त्याच्यावर तातडीने उपचार करावे लागत असल्याची माहिती दिली. पण कोविड पॉझिटिव रिपोर्ट नसल्यामुळे त्यांना औषधे उपलब्ध होत नव्हती. यावेळी रुग्णालयाने दुसऱ्याच रुग्णाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आणि आधारकार्ड या रुग्णाच्या नावावर जोडून मीरा रोड येथून औषध नातेवाईकांना घेऊन येण्यास सांगितले. रुग्णावर Covid-19 उपचार सुरू झाले आणि दहा तासातच हा रुग्ण दगावला. त्यानंतर, या रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे नातेवाईक अधिकच संतापले.

पूर्ण क्षमतेने डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी नाहीत...

या रुग्णालयात कोविड सेंटर असूनही रुग्णांची विशेष काळजी घेत नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे. तर पूर्णक्षमतेने डॉक्टर्स, नर्सेस , मेडिकल स्टाफ नसल्यामुळे इथल्या रुग्णांचे जीवन हे रामभरोसे आहे, असाही आरोप केला गेला आहे. या रुग्णालयात रुग्णांवर योग्य उपचार होत नसून त्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची माहिती या परिसरातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळाली. या वेळी भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करत रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णांच्या नातेवाइकांनी या रुग्णालयात सुरू असलेल्या कारभाराची पोलखोल केली. हे हॉस्पिटल त्वरीत बंद करावं अशी मागणी देखील केली. यावेळी नातेवाईकांनी जोरदार घोषणाबाजी करत डॉक्टरांनी बाहेर येऊन उत्तर देण्याची मागणी केली. मात्र रूग्णालयात एकही सक्षम जबाबदार डॉक्टर्स नसल्यामुळे पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवावं लागलं. हे हॉस्पिटल कोविड साठी सक्षम नसताना देखील महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी या रुग्णालयाला का परवानगी दिली अशी विचारणा होत आहे. 

रुग्णांची आर्थिक पिळवणूक

या रुग्णालयांमध्ये रुग्णांची आर्थिक पिळवणूक तर होत आहेच, मात्र रुग्णांवर उपचार करण्यासाठी सक्षम वैदकीय अधिकारी उपस्थित नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यापूर्वीही या रुग्णालयाबाबत महापालिकेकडे तक्रारी गेलेल्या आहेत. मात्र महापालिकेचे अधिकारीही या रुग्णालयावर कारवाई करण्यासाठी कुचराई करत असल्याचे आरोप यावेळी करण्यात आले आहेत.

नातेवाईक काय म्हणतायत ? 

किरण धनु, मयताचे नातेवाईक  म्हणतात, मयत प्रशांत काळे हे माझे दाजी आहेत. त्यांना केस्तुड उठल्यामुळे एका रुग्णालयात उपचारासाठी आम्ही दाखल केलं होतं. मात्र आम्हाला चुकीची माहिती देऊन डॉ. किरण पाटील यांनी फॅमिली केअर सेंटरमध्ये दाखल करायला भाग पडलं. कोरोना पॉझिटिव्ह नसताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने औषध उपचार करण्यात आले. यात त्यांचा मृत्यू झाला आणि कोरोना पॉझिटिव्ह मृत व्यक्तींवर ज्या पद्धतीने अंत्यविधी करण्यात येतो त्या पद्धतीने आम्ही त्यांच्यावर अंत्यविधी केले. आता त्यांचा रिपोर्ट आमच्याकडे आला , तो रिपोर्ट निगेटिव्ह आहे. मग हॉस्पिटलने आम्हाला खोटी माहिती का दिली ? आमच्या कडून अडीच लाख रुपये बिलाची रक्कम हॉस्पिटलने वसूल केलेली आहे. प्रशांत काळे यांचा मृत्यू नसून त्यांचा या हॉस्पिटलने खूनच केलेला आहे. असा आमचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.

स्थानिक भाजप नेत्या अक्षता तेंडुलकर म्हणतात, 32 वर्षे प्रशांत यांचा मृत्यू रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याची माहिती आम्हाला कळाली. त्यामुळे आम्ही पोलिसांकडे धाव घेतली. रुग्णालयात यासंदर्भात जाब विचारण्यासाठी आलो असता एकही सक्षम वैद्यकीय अधिकारी आमच्या समोर आले नाहीत. सर्वच पळून गेले होते. रुग्णालयाची आम्ही पाहणी केली असता हे रुग्णालय रामभरोसे सुरू आहे अशी अवस्था आहे. कारण रुग्णांवर उपचार करण्यासाठी एकही सक्षम वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाहीत. केवळ प्रायव्हेट नर्स च्या आधारावर हे रुग्णालय सुरू आहे. या रुग्णालयातील इतर रुग्णांची देखील आर्थिक पिळवणूक सुरू असल्याची तक्रार या रुग्णांच्या नातेवाइकांनी आमच्याकडे केलेली आहे. यासंदर्भात आम्ही रीतसर माहीम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

या संपुर्ण प्रकाराविषयी रुग्णालय प्रशासनाची संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

( संपादन - सुमित बागुल ) 

mahim family care hospital treats non covid patient as covid positive relatives demands action

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com