esakal | Sachin Waze Case: मुंबई पोलिस दलातील तिसरं निलंबन

बोलून बातमी शोधा

Mansukh-Hiren
Sachin Waze Case: मुंबई पोलिस दलातील तिसरं निलंबन
sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवसास्थानी सापडलेली स्फोटके तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असलेला पोलीस अधिकारी सुनील माने याला शनिवारी निलंबित करण्यात आलं. या प्रकरणात त्याचं नाव आल्यानंतर त्याची गुन्हे शाखेतून सशस्त्र (एलए) विभागात बदली करण्यात आली होती. या विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी त्याच्या निलंबनाचे आज आदेश दिले. आधी सचिन वाझे, नंतर रियाझ काझी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आज मुंबई पोलिस दलातील तिसरा पोलिस अधिकारी निलंबित झाला.

हेही वाचा: मनसुख हिरेन प्रकरणात WhatsApp कॉल ठरला महत्त्वाचा

NIAने काल सुनिल मानेला अटक केल्यानंतर त्याचा अहवाल राज्य गृहमंत्रालयाला पाठविला होता. तर NIAच्या विशेष न्यायालयाने सुनील मानेला 28 एप्रिलपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. काही तांत्रिक पुरावे तसेच ATSने केलेल्या चौकशीत सुनील माने यांचा मनसुख हिरेन प्रकरणात सहभाग आढळून आल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती NIA ने दिली आहे. दरम्यान, सुनिल माने हे मुंबईतील कांदिवली गुन्हे शाखेच्या कक्ष 11चे माजी पोलीस निरीक्षक होते. त्यावेळी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला मदत केली होती, असा संशय NIA ला आहे. 3 मार्च रोजी सचिन वाझे यांच्या CIUच्या केबिनमध्ये बैठक झाली होती. त्यात सुनील मानेही उपस्थित होता. या बैठकीत मनसुखला गुन्हा कबुल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता.

हेही वाचा: NIAचे नवे महानिरीक्षक मनसुख हिरेनच्या घरी

त्याच दिवशी रात्री अंधेरी पूर्व चकाला येथे सचिन वाझे, विनायक शिंदे, सुनील माने आणि आणखी एक माजी अधिकारी यांची या संदर्भात भेट झाली होती. या भेटीचे पुरावे NIAला मिळाले आहेत. कांदिवली क्राईम ब्रँच येथून तावडे नावाने मनसुख हिरेनला 4 मार्च रोजी रात्री फोन करून घोडबंदर रोडवर बोलावणारी व्यक्ती सुनील माने असावी, असा संशय NIA ला आहे. बुकी नरेश गोर याने उपलब्ध केलेल्या सीमकार्डपैकी दोन सीमकार्ड आणि मोबाईल सुनिल माने वापरत असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याने वाझेला अटक होताच, या प्रकरणातील अनेक पुरावे नष्ट केल्याचा संशय NIA ला आहे. मनसुख हिरेनला कारमध्ये घातल्यानंतर माने याने रेतीबंदरपर्यंत त्याला सुरक्षा पुरविल्याचा संशय NIA ला आहे. त्यानुसार, NIA च्या पथकाने माने याला रेती बंदर येथे नेऊन, त्या ठिकाणी तपास करण्यात आला. मानेशी संबंधित ठिकाणीही NIA ने शोध मोहिम राबवली.

(संपादन- विराज भागवत)