माथेरान मिनी ट्रेनप्रेमींसाठी खूशखबर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

सुरक्षेच्या कारणामुळे नेरळ-माथेरान मिनी ट्रेन मे 2019 पासून बंद आहे. त्याचा परिणाम माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर होत आहे. ही सेवा सुरू करण्याची मागणी विविध स्तरावरून होऊ लागल्यानंतर तात्पुरता दिलासा देण्यासाठी या मार्गादरम्यानच्या अमन लॉज - माथेरान ही शटल सेवा 25 डिसेंबर 2019 पासून सुरू करण्यात आली.

नेरळ, ता. 24 : पर्यटकांचे आकर्षण असलेली मिनी ट्रेन अर्थात माथेरानची राणी पुढील महिन्यापासून नेरळपासून धावण्याची शक्‍यता आहे. मध्य रेल्वेच्या सूत्रांनीही त्याला दुजोरा दिला आहे. सध्या नेरळ रेल्वेस्थानकात या ट्रेनसाठी बुकिंग कार्यालय पुन्हा उघडले असून स्वच्छता सुरू झाली आहे. 

हे वाचा : एवढ्याशा वयातही दिली मृत्यूशी झुंज

सुरक्षेच्या कारणामुळे नेरळ-माथेरान मिनी ट्रेन मे 2019 पासून बंद आहे. त्याचा परिणाम माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर होत आहे. ही सेवा सुरू करण्याची मागणी विविध स्तरावरून होऊ लागल्यानंतर तात्पुरता दिलासा देण्यासाठी या मार्गादरम्यानच्या अमन लॉज - माथेरान ही शटल सेवा 25 डिसेंबर 2019 पासून सुरू करण्यात आली.

 
हे वाचा : प्रकल्पग्रस्त आक्रमक

आता पुन्हा नेरळ-माथेरान अशी मिनी ट्रेन सुरू व्हावी, असा प्रयत्न सुरू आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल 14 फेब्रुवारीला नेरळ रेल्वेस्थानकात पाहणीसाठी आले होते. त्या वेळी माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा प्रसाद सावंत यांनी त्यांची भेट घेऊन नेरळपासून मिनी ट्रेन सुरू करण्याची मागणी केली होती. माथेरानचे पर्यटन वाढवण्यासाठी शटल सेवेच्या फेऱ्या वाढवणे आणि नेरळ-माथेरान प्रवासी सेवा सुरू करावी, आग्रही मागणी करणारे निवेदन त्यांनी या वेळी दिले. 

नेरळ-माथेरान हे अंतर 21 किलोमीटर असून त्यावर दररोज मालवाहू गाडी धावते. त्यामुळे मिनी ट्रेन सुरू करण्यास कोणतीही हरकत नाही, असे पर्यटक आणि माथेरानमधील स्थानिकांचे म्हणणे आहे. पुढील महिन्यापासून माथेरानचा पर्यटन हंगाम सुरू होत आहे. त्यापूर्वी मिनी ट्रेन सुरू करावी, अशी त्यांची मागणी आहे. 

त्यानुसार नेरळ रेल्वेस्थानकात मिनी ट्रेनचे आरक्षण कार्यालय पुन्हा उघडले आहे. या ठिकाणी स्वच्छता सुरू झाली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनीही सोमवारी (ता. 24) मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे व्यवस्थापक एस. गोयल यांची भेट घेऊन मिनी ट्रेन सुरू करण्याची मागणी केली. 
दरम्यान, मध्य रेल्वेच्या सूत्रांनीही पुढील महिन्यापासून मिनी ट्रेन सुरू होण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. 

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी 15 दिवसांपूर्वी नेरळ रेल्वेस्थानकाला भेट दिली होती. त्या वेळी मिनी ट्रेनच्या खास गाडीतून त्यांनी प्रवास केला. मिनी ट्रेनबाबत मध्य रेल्वे सकारात्मक आहे. लवकर मिनी ट्रेन नेरळ-माथेरान सेवा सुरू करण्यात येणार आहे. 
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Matheran mini train Starting next month