"मैत्रीण' स्पर्धेच्या बोधचिन्हाचे महापौरांच्या हस्ते अनावरण; महिलांना भरघोस बक्षिसे पटकावण्याची आजपासून संधी

दिनेश चिलप मराठे
Wednesday, 4 November 2020

"सकाळ' आणि "ऍग्रोवन'तर्फे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या अभिनव अशा "मैत्रीण' स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते राणीबागेतील महापौर निवासात झाले

मुंबई ः "सकाळ' आणि "ऍग्रोवन'तर्फे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या अभिनव अशा "मैत्रीण' स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते राणीबागेतील महापौर निवासात झाले. सकाळी 11 वाजता सुरक्षित अंतराचे पालन करीत मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात महापौरांनी महिलांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. भरघोस बक्षिसाबरोबरच सामान्यज्ञान वाढवण्याची संधी देणाऱ्या स्पर्धेचे त्यांनी स्वागत केले. 5 नोव्हेंबरपासून स्पर्धा सुरू होत आहे. 

हेही वाचा - सायन रुग्णालयात "कोव्हॅक्‍सिन'ची चाचणी होणार; लसीकरणासाठी भारत बायोटेककडून निवड

किशोरी पेडणेकर यांनी "सकाळ'च्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे अन्‌ चार दिवस मैत्रिणीचे अशा अनोख्या उपक्रमाचे भरभरून स्वागत होईल, यात शंकाच नाही, असे सांगत त्यांनी महिलांना मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी होण्याविषयी आवाहन केले. महापौरांबरोबरच विविध क्षेत्रांतील नामवंत महिलांच्या हस्ते स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण झाले. समुपदेशक आरती बनसोडे, लेखिका सुनीता तांबे, वीणा ट्रॅव्हल्सच्या टूर मॅनेजर प्राची गुरव, प्रयास संस्थेच्या सहायक संचालक प्रज्ञा शिंदे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. मैत्रीण स्पर्धा महिलावर्गासाठी अनोखी पर्वणी ठरेल हे नक्की, असा विश्‍वास मान्यवरांनी व्यक्त केला. 

हेही वाचा - मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा; हवेची गुणवत्ता सुधारण्यात देशात अव्वल

अशी असेल स्पर्धा 
महिलांच्या कर्तृत्वाला वाव मिळावा म्हणून "सकाळ'तर्फे सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले जात असतात. त्या अंतर्गत सर्व वयोगटांतील महिलांसाठी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या "मैत्रीण' सदरावर आधारित स्पर्धा सुरू करण्यात येत आहे. एकूण 60 दिवसांच्या कालावधीत "सकाळ' व "ऍग्रोवन'मध्ये महिलांसाठी मैत्रीण नावाचे खास सदर प्रसिद्ध होणार आहे. त्यात अलंकार (दागिने), त्वचा व केसांचे सौंदर्य, फॅशन, किचन गॅजेट्‌स, आरोग्य संवाद, योगासने, खाद्यपदार्थ, महिलांचे विषय आदींवरील लेखांचा समावेश असेल. त्यातील मजकुरावर आधारित प्रश्‍नांचा स्पर्धेत सहभाग असेल. 5 नोव्हेंबर 2020 ते 15 जानेवारी 2021 असा स्पर्धेचा कालावधी आहे. त्यासाठी महिलांनी सकाळ आणि ऍग्रोवनमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या स्पर्धेच्या प्रवेशिकेच्या तक्‍त्यात कूपन चिकटवावे लागणार आहे. 

 

महिलांसाठी "सकाळ' अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे एक सर्वोत्तम व्यासपीठ आहे. "सकाळ' फक्त वृत्तपत्र नसून वाचकांच्या मनामनामध्ये रुजलेला विचार आहे. "सकाळ'ला सहकार्य करणाऱ्या सर्व विचारवंत लेखिका आणि मैत्रीण स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांचे मी मनापासून स्वागत करते आणि त्यांना शुभेच्छा देते. 
- किशोरी पेडणेकर,
महापौर 

 

 

--------------------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayor unveils sakal Maitrin logo opportunity for women to win big prizes from today