ऐन लॉकडाऊनमध्ये सिडकोने उगारला कारवाईचा बडगा; आमदार म्हात्रेंनी केली कारवाई थांबवण्याची मागणी...

सुजित गायकवाड
मंगळवार, 14 जुलै 2020

सध्या सुरू असणारा पावसाळा आणि त्यात कोरोनाचे संकट अशा परिस्थितीत लोकांना बेघर करू नका, अशी मागणी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

नवी मुंबई : एकीकडे कोरोनासारख्या महामारीमुळे जनता हैराण झाली असताना दुसरीकडे सिडकोने गावठाणातील ग्रामस्थांच्या बांधकामांवर पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात केली आहे. नेरूळ, सारसोळे आणि घणसोलीतील काही प्रकल्पग्रस्तांच्या घरांना नोटिसा बजावून बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे; परंतु सध्या सुरू असणारा पावसाळा आणि त्यात कोरोनाचे संकट अशा परिस्थितीत लोकांना बेघर करू नका, अशी मागणी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

नवी मुंबई महापालिका आयुक्तांची पुन्हा बदली, नव्या आयुक्तांनी स्विकारला पदभार

नवी मुंबईतील सिडको हद्दीतील गावठाण आणि विस्तारित गावठाण जमिनीवरील बांधकामांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. महापालिका आणि सिडकोने याबाबत काही महिन्यांपूर्वी सर्वेक्षण सुरू केले होते. काही गावठाणांचे सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे; परंतु सरकार दरबारी हद्दीचा वाद अद्याप संपलेला नाही. अशा परिस्थितीत प्रकल्पग्रस्तांकडून बांधकाम करण्याचे सत्र सुरू आहे. बांधकाम करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांकडून सिडको आणि पालिकेकडे परवानगीही मागितली जाते; मात्र कागदपत्रांअभावी परवानगी नाकारली जाते. त्यामुळे गरजेसाठी प्रकल्पग्रस्तांकडून गावठाण जमिनीत बांधकाम सुरू आहेत. अशा बांधकाम असणाऱ्या नेरूळ येथील जागेवर सिडकोच्या अतिक्रमण पथकाने एक दिवसापूर्वीच कारवाई केली आहे. 

चिंताजनक! राज्यातील युवाशक्तीच कोरोनाच्या सावटात; तब्बल 'इतक्या' हजारांहून अधिक तरुणाईला बाधा...

आता सारसोळे आणि घणसोली येथील म्हात्रे आळीतदेखील कारवाईला सुरुवात केली. ऐन पावसाळ्यात आणि कोरोनासंकटात सिडकोकडून पाडकाम कारवाई सुरुवात केल्याने ग्रामस्थांमध्ये सिडकोविरोधात असंतोष निर्माण होत आहेत. सिडकोकडून सुरू असणाऱ्या या कारवाईला आमदार मंदा म्हात्रे यांनी कडाडून विरोध केला आहे. पावसाळ्यात बांधकामावरील कारवाईला न्यायालयाने बंदी असताना सिडकोकडून सुरू असणारी कारवाई मानवतेला धरून नाही. 

त्यामुळे सध्या ही कारवाई थांबवण्याबाबत मंदा म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासहित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याकडे कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. याआधीदेखील तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात महापालिकेतर्फे सुरू असणाऱ्या गावठाणातील बांधकांमावर होणाऱ्या कारवायांविरोधात मंदा म्हात्रे या एकट्या आमदार मैदानात उतरल्या होत्या. आता पुन्हा एकदा मंदा म्हात्रे यांनी कारवाईविरोधात शड्डू ठोकला आहे. 

लोकलमधील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने आखली 'ही' योजना

नवी मुंबईतील नागरिक अद्याप कोरोनासारख्या महामारीतून सावरलेले नाहीत. अशा परिस्थितीत सिडको प्रशासन डोक्यावरून छत काढायचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आम्ही सरकारला ही अन्यायकारक कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे.
- मंदा म्हात्रे, आमदार, भाजप

---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mla manda mhatre asked cidco to stop action by cidco in navi mumbai