esakal | 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेवर मनसे भडकली... वाचा काय आहे प्रकरण
sakal

बोलून बातमी शोधा

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेवर मनसे भडकली... वाचा काय आहे प्रकरण

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेवर मनसे भडकली... वाचा काय आहे प्रकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: गेल्या १२ वर्षांपासून सतत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या मालिकेच्या एका भागामध्ये मुंबईची भाषा 'हिंदी' आहे असं म्हणण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावर चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी यासंबंधीचं ट्विट केलंय. 

धक्कादायक! २०२० मध्ये कोरोना येईल, १९८१ मध्येच एका पुस्तकात लिहिली होती कथा

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका तब्बल १२ वर्षांपासून सुरू आहे. या मालिकेचे २९०० पेक्षा जास्त भाग झाले आहेत. मुंबईमधल्या 'गोकुळधाम सोसायटी' इथे राहणाऱ्या देशाच्या निरनिराळ्या भागांमधल्या लोकांवर आधारित ही मालिका आहे. मात्र, या मालिकेत मुंबईची भाषा 'हिंदी' आहे असं उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांक़डून यावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

नक्की काय म्हंटलंय त्या भागात:

या मालिकेच्या एका भागात जेठालालचे वडील सर्वांना सुविचार आणि त्या संबंधीच्या भाषेचं महत्व पटवून देत होते.  यावेळी मुंबईची भाषा हिंदी आहे. त्यामुळे आपण सुविचार हिंदीमधून लिहितो असं त्यांनी म्हंटलं. यावरुन मनसे आक्रमक झाली आहे.  

काय म्हणाले अमेय खोपकर: 

" मुंबईची भाषा ही 'मराठी' आहे हे यांना चांगलं माहिती आहे. तरीही मालिकांमधून पद्धतशीरपणे अपप्रचार सुरू असतो. यांची मस्ती उतरवावीच लागेल. या गुजराथी किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. विशेष म्हणजे यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांना यात काही चूक वाटत नाही, याचीच शरम वाटते. " असं ट्टविट अमेय खोपकरांनी केलंय. 

हेही वाचा: खालापूरजवळ आणखी एक अपघात

दरम्यान, या मालिकेचे निर्माते आसितकुमार मोदी यांनी याची दखल घेत एक ट्टविट केलं आहे. 

काय म्हणाले मालिकेचे निर्माते: 

"मुंबई महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. यात काहीही शंका नाही. मी भारतीय आहे, महाराष्ट्राचा रहिवासी आहे आणि गुजरातीही आहे. आपल्या सगळया भाषा एक आहेत. मी सर्व भाषांचा सन्मान करतो" असं स्पष्टीकरण निर्मात्यांकडून देण्यात आलं आहे. 

आता या प्रकरणानंतर मनसे नक्की काय पावलं उचलते हे बघणं महत्वाचं असणार आहे.      

MNS blamed taarak mehta kaa ulta chashma for insulting marathi language