नवी मुंबईकरांसमोर आता नवे आव्हान; वानरसेनेचा धुमाकूळ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

सीबीडी-बेलापूरमधील नागरिक हैराण

नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे रस्त्यांसोबत मानवी वस्तीच्या शेजारील जंगल परिसर निर्मनुष्य झाल्याने वन्यजीवांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. वनांमधील मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे रहिवाशी वस्तीत आणि रस्त्यांवर वन्यप्राणी सहज बागडतानाचे व्हिडीओ अलीकडच्या काळात समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूरमध्ये माकडांनी मानवी वस्तीत घुसून उच्छाद मांडला आहे. सीबीडी-बेलापूरमधील उच्चभ्रू वस्तीमध्ये घुसन घरांच्या छतांचे व झाडांवरील फळांचे नुकसान केल्याने नागरिक पुरते हैराण झाले आहेत.

कोरोना लढ्यात भारतावर मोठी जबाबदारी; डॉ. हर्षवर्धन डब्ल्यूएचओ कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी 

सीबीडी बेलापूर सेक्टर 8 आणि 9 च्या कडेचा भाग संपूर्ण डोंगर आणि जंगलाने व्यापलेला आहे. या भागात एकीकडे खारघर हिलचा डोंगरकडा आहे, तर दुसरीकडे सायन-पनवेल महामार्गाच्या कडेचा बेलापूरचा डोंगर आहे. या दोन्ही डोंगररांगांमधोमध सीबीडी-बेलापूर वसले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या जंगल परिसरात अनेक वन्यप्राणी आहेत; परंतु जेव्हा जनजीवन सुरळीत होते, तेव्हा या झाडीझुडपात रोज सकाळी नागरिक फिरायला जायचे. प्रेमीयुगुल बसलेले असायचे, काही तरुण जंगलात ट्रेकिंगला जायचे. त्यामुळे सतत मानवी हस्तक्षेप असल्याने हे वन्यजीव केव्हाच डोंगरांवरून खाली येत नसायचे; मात्र संचारबंदी असल्यामुळे आता मानवी हस्तक्षेप कमी झाला आहे. त्यामुळे अन्नाच्या शोधात जंगलातील प्राणी सीबीडीतील या वस्तीत घुसत आहेत.

मुंबईतील लोकवस्त्या होताहेत सुन्यासुन्या! बेरोजगारीमुळे स्थलांतर वाढले

सीबीडी-बेलापूर सेक्टर 8 ए आणि 9 भागातील उच्चभ्रू वस्तीत रोज सकाळी आणि दुपारच्या वेळेस ही माकड येत आहेत. आर्टिस्ट व्हिलेजच्या पाठीमागील वस्ती, साई मंदिरापाठीमागील रो हाऊस आणि इमारतींच्या छतांवर ही माकडे रोज या झाडांवर त्या झाडांवर उड्या मारत असतात. झाडांवर फळे खाऊन झाल्यावर इमारतींवरील गॅलरीत लावलेल्या ग्रीलवर चढून घाण करतात. रो हाऊसच्या छतावर लावलेल्या पत्र्यांवर चढून उड्या मारतात. बागेतील झाडांवरील फळे घाऊन घाण करतात अशा तक्रारी एका रहिवाशी महिलेने सांगितल्या.

रेल्वेकडून टाळेबंदीचा सदुपयोग...मान्सूनपूर्व दुरुस्तीकामांना वेग 

कधी कधी दुपारच्या वेळेस रो हाऊसच्या खिडक्यांच्या ग्रीलला लटकून माकडे चाळे करीत बसतात. त्यामुळे घरात राहणाऱ्या एकट्या ज्येष्ठ नागरिकांना भीती वाटते. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात वानर येतात. ही पहिली वेळ नाही; मात्र आता वानरांचे येण्याचे प्रमाण वाढले असून ते टोळक्यांनी येत आहेत. याबाबत अनेकदा वनखात्याकडे तक्रार केली आहे; परंतु काहीच फरक पडला नाही, असे स्थानिक माजी नगरसेवक अशोक गुरखे यांनी सांगितले.

Monkeys harass citizens in CBD-Belapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monkeys harass citizens in CBD-Belapur