धक्कादायक! परदेशांतून परतणाऱ्या भारतीय प्रवाशांची विमानतळावर लूट; वाचा कुणी केलाय हा आरोप...

gvk cabs
gvk cabs

मुंबई : वंदे भारत अभियानांतर्गत परदेशांतून मुंबईत परतणाऱ्या भारतीय नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी आरटीओ प्रशासनाने फेडरेशन ऑफ टुरिस्ट टॅक्सी ऑपरेटर्स (फोट्टो) यांना दिली होती. परंतु, जीव्हीके प्रशासनाने हस्तक्षेप करत काही खासगी टुरिस्ट व्यावसायिकांना प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी दिली असून, मनमानी भाडेवसुली केली जात असल्याचा आरोप फेडरेशनने केला आहे. 

कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर परदेशांत अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने वंदे भारत मिशन सुरू केले. देशातील प्रमुख नऊ विमानतळांवर हे प्रवासी उतरत असून, त्यांच्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही समावेश आहे. परदेशांतून मुंबईत परतणाऱ्या भारतीय नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यांच्या ठिकाणी सुरक्षित पोहोचचण्याची जबाबदारी आरटीओ प्रशासनाने फेडरेशन ऑफ टुरिस्ट टॅक्सी ऑपरेटर्स यांना दिली होती. 

सुरुवातीपासून जवळपास अडीच महिने फेडरेशनद्वारे राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून माफक भाड्यात प्रवासी सेवा पुरवण्यात येत होती. प्रवाशांचे नुकसान होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळून वेगवेगळ्या जिल्ह्यांतील नागरिकांना समान भाडे आकारणी करून एकाच वाहनातून घरी सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले. त्यासाठी वातानुकूलित बसगाड्यांचा वापर करण्यात आला.

काही दिवसांपासून जीव्हीके प्रशासनाने हस्तक्षेप करत त्यांच्या मर्जीतील काही खासगी टुरिस्ट ऑपरेटर्सना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली असून, फेडरेशनच्या वाहनांना विमानतळावर प्रवेशबंदी केली आहे. सरकारचे नियम धाब्यावर बसवून हे खासगी व्यावसायिक मनमानी भाडे घेऊन प्रवाशांची लूट करत असल्याचा आरोप फेडरेशनने केला आहे. वंदे भारत मिशनला हरताळ फासणाऱ्या जीव्हीके प्रशासनावर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी फेडरेशनने केली आहे.  दरम्यान, या आरोपांबाबत जीव्हीके प्रशासनाचे सिक्युरिटी अँड लँडसाईड ऑपरेशन्स उपमहाव्यवस्थापक सुरेश चौहान यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

राज्य परिवहन विभागाने फेडरेशन ऑफ टुरिस्ट टॅक्सी ऑपरेटर्सला दोन महिन्यांपूर्वी विमातळावरील प्रवाशांना त्यांच्या जिल्ह्यांत सोडण्याची जबाबदारी दिली होती. आरटीओ विभाग आणि फेडरेशनमध्ये चर्चा होऊन अल्प भाडेदरात ही सेवा सुरू होती. त्यानंतर आता जीव्हीकेने आपली वाहने आणली असून, मनमानी भाडे आकारून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची लूट चालवली आहे. यावर कारवाई होणे आवश्यक आहे. 
-  मलिक पटेल, सरचिटणीस, फेडरेशन ऑफ टुरिस्ट टॅक्सी ऑपरेटर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com