गोरेगाव नेस्कोत आवाज चाचणी शेवटच्या टप्प्यात, 2000 लोकांचे नमुने गोळा, लवकरच मिळणार अहवाल 

भाग्यश्री भुवड
Tuesday, 17 November 2020

गोरेगावच्या नेस्को कोविड केंद्रातून आवाजावरून केल्या जाणाऱ्या कोरोना चाचणी प्रयोगासाठी लागणारे 2000 नमुने गोळा करण्यात आले आहेत.

मुंबई, 17 : गोरेगावच्या नेस्को कोविड केंद्रातून आवाजावरून केल्या जाणाऱ्या कोरोना चाचणी प्रयोगासाठी लागणारे 2000 नमुने गोळा करण्यात आले आहेत. दरम्यान, आवाजावरून होणारी कोरोनाची चाचणी शेवटच्या टप्प्यात असून लवकरच याचा अहवाल मिळणार आहे. 

प्रत्येक रुग्णाचे दोन किमान 2 आवाजाचे नमुने घेण्यात आले असून जवळपास 4000 व्हॉईस रेकॉर्डिंग केले गेले आहेत. दर आठवड्यात जवळपास 360 ते 400 रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी पाठवले जात आहे. त्यामुळे लवकरच ही चाचणी किती लाभदायक आहे याचा अहवाल मिळणार आहे. 

महत्त्वाची बातमी : वीजग्राहकांना लॉकडाऊन काळात आलेली वीजबिले भरावी लागतील, सवलतीची आशा मावळली

नेस्को'त आवाजावरुन स्क्रिनिंग करण्याच्या अभ्यासाला 5 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. गेल्या दोन महिन्यात 2 हजार लोकांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. तर संकलित करण्यात आलेले 360 नमुने इस्त्रायलला तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे नेस्कोच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले. दरम्यान, एकूण दोन हजार लोकांचे नमुने संकलित करण्यात आले असून लवकरच याचा अहवाल मिळणार आहे. 

आवाजावरुन स्क्रिनिंग करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 500 रुग्णांचे नमुने, त्यांना कुठला आजार आहे का आदी सविस्तर माहिती पाठवण्यात आली आहे. उर्वरित 1, 500 रुग्णांच्या फक्त आवाजाचे नमुने पाठवण्यात येणार असून केस रिपोर्ट पाठवण्यात येणार नाही. रुग्णांचे घेण्यात येणारे नमुने इस्त्रायलला मेलद्वारे पाठवण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या. 

महत्त्वाची बातमी : 'स्मारक की मातोश्री तीन??'; मनसे नेत्याचा शिवसेनेला खोचक सवाल

कोरोना संशयित रुग्णांना शोधण्यासाठी विविध स्क्रिनिंग पध्दतींचा वापर केला जात आहे. यामध्ये ताप मोजणे, ऑक्सिजनची पातळी तपासणी याचा समावेश आहे. त्यात आणखी एका अत्याधुनिक पध्दतीची भर पडली आहे ती म्हणजे व्हाईस बायो मार्कर आर्टिफिशियल इंटिलीजन्स. अर्थात आवाजावरून स्क्रिनिंग पद्धती. ही पद्धती योग्य आणि गुणवत्तापूर्ण आहे का याचा गोरेगाव येथील नेस्को कोविड सेंटरमध्ये तीन महिने अभ्यास केला जाणार आहे. नेस्कोतील 2000 पॉझिटिव्ह रुग्णांवर प्रयोग करत हा अभ्यास केला जाणार आहे. तीन महिन्यांनंतर याचा अहवाल सादर झाल्यानंतर ही पद्धती योग्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरच याचा वापर मुंबईत स्क्रिनिंगसाठी केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

महत्त्वाची बातमी : बाळासाहेबांना आदरांजली वाहताना फडणवीसांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

अमेरिका आणि इस्त्राईलमध्ये ही पद्धती स्क्रिनिंगसाठी वापरण्यात येते. नागरिकांच्या आवाजावरून केवळ 30 सेकेंदात कोरोनाची लक्षणे आहेत की नाहीत हे समजते. त्यानंतर लक्षणे असलेल्या रुग्णांची अँटिजेन किंवा आरटीपीसीआर कोरोना चाचणी केली जाते. खूपच कमी वेळात संशयित रुग्णांचा शोध घेता येत असल्याने मुंबईतही हे शक्य आहे का असा विचार पुढे आला. यानंतर मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेत 'व्होकोलिस हेल्थ' या इस्रायली कंपनीबरोबर मिळून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिका आणि इस्त्रायली कंपनीमध्ये सामंजस्य करार झाला असून गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटर मध्ये 5 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष संशोधनाला सुरुवात झाल्याचेही त्यांनी सांगितले.

more than two thousand voice samples collected for covid test from nesco jumbo covid center


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more than two thousand voice samples collected for covid test from nesco jumbo covid center