esakal | मुंबई: ऑनलाईन सभेसाठी भाजप आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई: ऑनलाईन सभेसाठी भाजप आक्रमक

मुंबई: ऑनलाईन सभेसाठी भाजप आक्रमक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी निवडणुकीआधीच सत्ताधारी शिवसेना विरूद्ध भाजप असा सामना रंगला आहे. महापालिकेच्या सभा, बैठका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन होत आहेत. परंतु, या ऑनलाईनच्या माध्यमातून शिवसेना भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करून भाजपने प्रत्यक्ष बैठका घेण्याची मागणी करत आज महापौरांच्या दालनाबाहेर निदर्शने केली.

हेही वाचा: काँग्रेसनेच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला : मंत्री रामदास आठवले

त्यावर, प्रशासनाच्या निर्णयानुसारच बैठका ऑनलाईन होत असल्याने भाजपने आयुक्तांच्या दालनासमोरच आंदोलन, करावे असे प्रतिउत्तर शिवसेनेकडून देण्यात आले. बेस्ट समितीच्या मंगळवारी (ता. २१) झालेल्या बैठकीत डिजिटल तिकिटिंगचा प्रस्ताव कोणतीही चर्चा न होता शिवसेनेने मंजूर केला. यात, ३५ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. महासभेसह सर्व समित्यांच्या बैठका ऑनलाईन होत असल्याने सत्ताधाऱ्यांचे फावले आहे. त्यातून पालिकेत भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जाते, असा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला. कोविड लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे.

मग, दोन डोस घेतलेल्या नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठका का होत नाही, असे सांगत सर्व बैठका प्रत्यक्ष होण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगितले. प्रत्यक्ष सभा घेण्यासाठी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सरकारच्या नियमानुसार बैठका घेण्यात येतील, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले. प्रत्यक्ष बैठका घेण्याची भूमिका शिवसेनेचेही असल्याचे त्यांनी सांगितले. तर, भाजपने आयुक्तांच्या दालनाबाहेर निदर्शने करायला हवीत, असा टोला सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी लगावला.

लोकल बंद, बेस्ट रस्त्यावर

भाजप आता निवडणुकीच्या तोंडावर राजकरण करत आहे. कोविडच्या पहिल्या लाटेत लोकल सेवा केंद्र सरकारच्या निर्णयानुसार बंद करण्यात आल्या होत्या. त्या काळात बेस्ट रस्त्यांवर धावत होती. भाजपने लोकल बंद करून नागरिकांना उपाशी मारण्याचाच निर्णय घेतला होता, असा टोला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपला लगावला.

loading image
go to top