मुंबई : मध्य रेल्वेकडून माथेरान रेल्वे उत्सव साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : मध्य रेल्वेकडून माथेरान रेल्वे उत्सव साजरा

मुंबई : मध्य रेल्वेने आणि माथेरान नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने माथेरान रेल्वे उत्सव साजरा केला. १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. रेल्वेच्या प्राचीन इतिहासाचे प्रदर्शन, मध्य रेल्वेच्या हरित उपक्रमांचे चित्रण आणि माथेरानचे पर्यावरण-संवेदनशील झोनमध्ये उत्क्रांतीचे चित्रण या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखविण्यात आले.

दोन दिवसीय महोत्सवात माथेरान स्थानकावर आयोजित उद्घाटन कार्यक्रमात मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक बी. के. दादाभोय हे प्रमुख पाहुणे होते. प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता ए. के. गुप्ता, मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल आणि मध्य रेल्वेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दादाभोय यांच्या हस्ते महोत्सवानिमित्त फुगे सोडण्यात आले आणि एका स्टॉलचे उद्घाटनही करण्यात आले. फोटोग्राफी आणि ड्रॉइंग स्पर्धेतील विजेत्यांना त्यांनी बक्षिसेही दिली.

हेही वाचा: IND vs NZ Test : वानखेडे स्टेडियवर 100 टक्के एन्ट्री; राज्य सरकारनं दिली परवानगी

या कार्यक्रमात आयोजित वृक्षारोपण मोहिमेचा एक भाग म्हणून अतिरिक्त महाव्यवस्थापक, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही रोपे लावली. या कार्यक्रमात मध्य रेल्वेच्या विविध हरित उपक्रम, माथेरान नगर परिषदेने माथेरानच्या संवर्धनासाठी घेतलेले विविध उपक्रम, सगुणा फार्म्सचे लँडस्केप आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पुढाकार आणि मेसर्स पॉलीक्रॅकचे वेस्ट टू एनर्जी मॅनेजमेंट या विषयावर सादरीकरण आणि चर्चा झाली. हसेची पट्टी ग्रुपचे आदिवासी लोकनृत्य आणि विभागीय सांस्कृतिक अकादमी, मुंबई विभागाच्या कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रमही महोत्सवात सादर करण्यात आला.

माथेरान उत्सव हे पर्यावरणाचे संवर्धन आणि माथेरानच्या पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या दिशेने मध्य रेल्वेचे आणखी एक सकारात्मक पाऊल आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
अमन लॉज आणि माथेरान दरम्यानच्या प्रवाशांसाठी शटल सेवेसह मध्य रेल्वेने हे ठिकाण केवळ एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून नव्हे तर निसर्गाच्या जवळ जाणारे ठिकाण म्हणून लोकप्रिय करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या पर्यटनस्थळी येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे स्थानिकांना उपजीविका उपलब्ध करून देत माथेरानची अर्थव्यवस्था सुधारण्यास हातभार लावत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

हेही वाचा: सोलापूर : रेल्वेने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदल्यासाठी आंदोलन

मध्य रेल्वेचे पर्यावरण संवर्धनसाठी पाऊल
गेल्या चार वर्षांत मध्य रेल्वेने रेल्वेच्या जमिनीवर विविध प्रकारच्या झाडांच्या १८ लाखांहून अधिक रोपांची लागवड केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुर्मिळ मसाले आणि औषधी वनस्पतींची १२० रोपे असलेले वनौषधी उद्यान उभारण्यात आले आहे. मध्य रेल्वेवर १५ रोपवाटिकांची स्थापना आणि विकास करण्यात आला आहे. ८७ इको-स्मार्ट स्टेशन्स, वाडीबंदर येथील ऑटोमॅटिक कोच वॉशिंग प्लांट, १३३ स्थानकांवर रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स, ५ इमारतींना आयजीबीसी ग्रीन सर्टिफिकेशन हे मध्य रेल्वेने मागील काही वर्षांत हरित पर्यावरणासाठी केलेले इतर काही उपक्रम आणि ॲचिव्हमेंट्स आहेत.

loading image
go to top