

Mumbai Crackers Ban
esakal
मुंबई : ध्वनी आणि वायू प्रदूषण न करताही सण-उत्सव साजरे केले जाऊ शकतात, असे निरीक्षण नोंदवत मुंबईसह राज्यभरात सण-उत्सवाच्या काळात रस्त्यांवर फटाके वाजविण्यावर संपूर्ण बंदी घालण्याचे तोंडी आदेश आज उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले, तसेच धार्मिक मिरवणुकांदरम्यान ध्वनिवर्धक, ‘डीजे’ आणि लेझर बीम्सचा वापरही अनावश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले.
मुंबईसारख्या शहरात सणासुदीत रस्त्यांवर फटाके फोडण्याची परवानगीच का असावी? याच कालावधीत मुंबईत वायुप्रदूषण सुरू होते आणि धुरके दाटून येते, हे थांबवले पाहिजे. दिवस असो वा रात्र... रस्त्यांवर फटाके फोडता येणार नाहीत, असेही न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने तोंडी आदेश देताना नमूद केले. तत्पूर्वी, मुंबईतील ‘डीजे’ वाजविण्यावर राज्य सरकार किंवा अन्य कोणत्याही यंत्रणेचा अंकुश नाही म्हणून ही परिस्थिती ओढावल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले.
अनेकदा डीजे, डॉल्बीसाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेल जनरेटरमुळेही प्रदूषणात अधिकच भर पडते, असेही न्यायालयाने सरकारच्या निदर्शनास आणून दिले. सण-उत्सवांदरम्यान ध्वनिवर्धक व अन्य आवाजासह सार्वजनिक ठिकाणी फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे ध्वनी व वायूप्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाल्याचा उल्लेख करीत, उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली.
मुंबईत रस्त्यांवर कोणतीही तमा न बाळगता फटाके फोडल्याने अनेक अपघात होतात. रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना नाहक त्रास होतो. आपण सण-उत्सव आनंद, मनःशांती मिळावी म्हणून साजरे करतो; मात्र आता फटाक्यांमुळे अनेकांना वेगवेगळ्या व्याधी जडतात. सुरक्षिततेचे उपाय असूनही दहीहंडीमध्ये अपघात होतात, मग असले सण काय उपयोगाचे, अशी उद्विग्नता न्यायालयाने व्यक्त केली.
नागपूरचे पोलिस आयुक्त डीजे, डॉल्बीवर बंदी लादू शकतात, मग मुंबईचे पोलिस आयुक्त का बंदी लादू शकत नाहीत? दोन्ही आयुक्तांमध्ये समन्वय हवा, असेही न्यायालयाने सुनावले. आमचा सण-उत्सवाला विरोध नाही. ते साजरे झालेच पाहिजेत; पण नियमांचे पालन करून. वाहतूक कोंडी आणि कचऱ्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या मुंबईकरांच्या त्रासात आता ध्वनी आणि वायू प्रदूषणाचीही भर पडली आहे. त्यांनी जगायचे तरी कसे, अशी विचारणाही न्यायालयाने केली.
मुंबई पोलिसांनी नऊ ते २६ सप्टेंबर कालावधीत परवानगीशिवाय पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्यास बंदी घालणारा आदेश काढला. तसेच फटाके व लाऊडस्पीकरवरही पूर्ण बंदी घातल्याची माहिती राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांनी न्यायालयाला दिली.
"उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाबाबत दिलेल्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो. सण-उत्सव साजरे करताना पुणेकरांना कर्णकर्कश आवाजाचा त्रास होऊ नये, ही आमची भूमिका आहे. पोलिस, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेने समन्वयाने न्यायालयाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी."
- मुकुंद किर्दत, लाउडस्पीकरविरोधी पुणेकर मंच
"उत्सव साजरा करताना नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी गणेश मंडळे घेतील. निर्णयाच्या अंमलबजावणीत व्यावहारिक अडचणी आल्यास त्या न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन त्यावर योग्य तो मार्ग काढता येईल."
- रवींद्र माळवदकर, अध्यक्ष, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर
गणेशोत्सवात कर्णकर्कश आवाजात डीजे, डॉल्बी, लाउडस्पीकर वाजविल्याने किंवा फटाके वापरल्याने देव आपल्याला अतिरिक्त आशीर्वाद देणार आहेत का, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. एक जबाबदार समाज म्हणून आपण या गोष्टींना आळा घातला पाहिजे, असे सांगताना न्यायालयाने आषाढी वारीचा आदर्श घेण्यास सांगितले.
रस्त्यांवर फटाके उडविण्यावर बंदी
मेटॅलिक सिलिंडर वाजविण्यावर बंदी
नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा
मिरवणुकीची पोलिस परवानगी घेतल्याचे ठळकपणे प्रदर्शित करा
परवानगीसाठी मोठी अनामत रक्कम घेण्यात यावी
ही नियमावली सर्व सणांना लागू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.