Kurla Fire : कुर्ल्यातील आगीत यंत्रणेचा बळी ठरली वयोवृद्ध महिला

मुंबईत पुनर्वसनाच्या प्रकल्पाचे खुराडे असणाऱ्या एमएमआरडीएच्या वसाहतीत १२ व्या मजल्यावर यंत्रणेचा नाहक बळी आगीच्या घटनेमुळे गेला.
Fire
FireSakal
Summary

मुंबईत पुनर्वसनाच्या प्रकल्पाचे खुराडे असणाऱ्या एमएमआरडीएच्या वसाहतीत १२ व्या मजल्यावर यंत्रणेचा नाहक बळी आगीच्या घटनेमुळे गेला.

मुंबई - मुंबईत पुनर्वसनाच्या प्रकल्पाचे खुराडे असणाऱ्या एमएमआरडीएच्या वसाहतीत १२ व्या मजल्यावर यंत्रणेचा नाहक बळी आगीच्या घटनेमुळे गेला. शकुंतला रामणे या ७० वर्षीय अपंग वयोवृद्ध महिलेचा आगीच्या धुराने गुदमरून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. आगीची घटना घडल्यानंतर १२ व्या मजल्यावर एकीकडे इतर कुटुंबे आपल्या जीव वाचवण्याच्या प्रयत्नात होते, तर दुसरीकडे एका घरातील महिलेच्या अपंगत्वामुळे या महिलेला वाचवण्यात अपयश आले. या महिलेचा वयोवृद्ध पती मात्र सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.

कोहीनूर परिसरातील एमएमआरडीएच्या इमारत क्रमांक ७ च्या सी विंगमध्ये डक्टमध्ये शॉर्ट सर्कीटने आग लागण्याचा प्रकार सकाळी ७ वाजता घडला. चौथ्या मजल्यावर लागलेल्या आगीच्या धुराचे लोळ हे १२ व्या मजल्यांपर्यंत पोहचले. त्यामुळे काहींनी गच्चीवर जाण्याचा पर्याय निवडला, तर काही लोक जिन्याने इमारतीतून खाली उतरले. परंतु १२ व्या मजल्यावर अडकलेल्या ७० वर्षीय शकुंतला रामाणे यांना मात्र कोणतीही हालचाल करता आली नाही. त्यामुळे धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे कारण समोर आले आहे. त्यांच्यासोबत असणारे ७४ वर्षीयपती शिवराम रामाणे यांना मात्र बिल्डिंगमधील रहिवाशांनी वेळीच गच्चीवर नेले. त्यामुळे धुरातून बाहेर काढण्यात यश आले. सध्या राजावाडी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रक्रिया चिंताजनक आहे. इतर आणखी ७ जणांवरही याठिकाणी उपचार सुरू आहेत.

आग लागण्याची घटना घडल्यानंतर तत्काळ काही मिनिटातच अग्निशमन दलाच्या गाड्या या परिसरात दाखल झाल्या. अतिशय चिंचोळ्या भागात असणाऱ्या इमारतींमध्ये प्रवेश करण्यासाठी गाड्यांना सुरूवातीला अडथळा आला, पण स्थानिकांनी पार्किंग केलेल्या गाड्यांची जागा मोकळी केल्याने वेळीच गाड्यांना इमारतीखाली प्रवेश मिळाला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. सकाळी ८.४२ वाजता आगीवर नियंत्रण मिळवत ही आग विझवण्यात आली.

अनेक मजल्यांवर अडकलेल्या रहिवाशांसह लहान मुलांचा जीव अग्निशमन दलाची यंत्रणा वेळीच पोहचल्यामुळे वाचला. तर चौथ्या मजल्यावरील एका अर्धांगवायु झालेल्या व्यक्तीला वाचवण्यात स्थानिकांच्या प्रयत्नांना यश आले. कुटुंबीयांनी या रूग्णाला वाचवण्यासाठी आक्रोश केल्यानेच या व्यक्तीचा जीव वाचू शकला.

या इमारतीच्या टेरेसवर काही लोक अडकल्याची माहिती मिळताच जवानांनी शिडीच्या सहाय्याने तब्बल २५ रहिवाशांना टेरेस वरुन सुखरुप सुटका केली, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख संजय मांजरेकर यांनी दिली. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या शकुंतला रमाणी (७०) यांना जवळील राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर ७ जखमींवर उपचार सुरु असून सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास अग्निशमन दलाचे अधिकारी व स्थानिक पोलीसांकडून केला जातो आहे.

एमएमआरडीएने कोहिनूर परिसरात एचडीआयएल या विकासकाच्या माध्यमातून विकसित केलेल्या इमारतींमध्ये प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. सध्या इमारतीत राहणारी कुटुंबे ही घाटकोपर जलवाहिनीच्या प्रकल्पातून याठिकाणी येऊन राहिलेली आहेत. परंतु इमारतीची झालेली दुरावस्था, कोणतीही देखभाल दुरूस्ती किंवा ऑडिट नसणे अशा धोकादायक परिस्थितीत ही कुटुंबे राहत आहेत. शिवाय या कुटुंबांना मिळणारा अस्वच्छ पाणी पुरवठा आणि अपुरा सूर्यप्रकाश, अस्वच्छ परिसर अशा दाटीवाटीच्या परिसरात या कुटुंबांना दिवस काढावा लागत आहेत.

इमारतीची अग्निशमन यंत्रणा नव्हती कार्यरत

एमएमआरडीए वसाहतींमधील एक इमारत असलेल्या ७ सी इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवण्यात लावली होती. परंतु या यंत्रणेचे ऑडिट न झाल्याने ही यंत्रणा कार्यान्वयित नव्हती. त्यामुळे अग्निशमन दल दाखल झाल्यानंतर या यंत्रणेचा वापर करणे त्यांना शक्य झाले नाही. इमारतीमधील तरूणांनी याठिकाणी धावाधाव करून अग्निशमन दलाचे पाईप हे १२ व्या मजल्यावर नेल्याने ही आग विझवतानाच लोकांना सुखरूप बाहेर काढणे शक्य झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com