esakal | Mumbai : बलात्कार प्रकरण : 21 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

बलात्कार प्रकरण

बलात्कार प्रकरण : 21 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : डोंबिवलीत 15 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी 33 जणांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. यातील 21 आरोपींची पोलीस कोठडी बुधवारी संपल्याने त्यांना आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. बचाव पक्षाच्या वकिलांनी संशयितांना न्यायालयीन कोठडी दिली जावी ही मागणी केली. मात्र ही घटना गंभीर आणि घृणास्पद असल्याचे सांगत जिल्हा न्यायाधीश एस.आर. पहाडे यांच्या न्यायलायाने अधिक तपासासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत 5 दिवसांची वाढ केली आहे.

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना मागील आठवड्यात उघडकीस आली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात पोक्सो अंतर्गत 33 जणांना ताब्यात घेतले आहे. यात 23 आरोपींना पोलिसांनी सर्व प्रथम ताब्यात घेतले होते. त्यातील 2 अल्पवयीन असल्याने त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर उर्वरित 21 आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ती बुधवारी संपल्याने त्यांना बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालय हजर करण्यात आले. बचाव पक्षाकडून 7 ते 8 वकिलांनी बाजू मांडली. तर पीडित मुलीची बाजू सरकारी वकिलांनी मांडली.

हेही वाचा: नसरापूर : कंपनीने १६ कामगारांना कामावरुन काढले; मनसेचे आंदोलन

याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी काही पुरावे गोळा केले आहेत, मात्र अधिक पुरावे गोळा करण्यासाठी तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्यासाठी पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. यावर हरकत घेत बचाव पक्षाच्या वकिलांनी सांशीयतांना न्यायालयीन कोठडी मिळावी अशी मागणी केली. मात्र सदर घटना ही गंभीर आणि घृणास्पद असल्याने पोलिसांना अधिक तपासासाठी न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत वाढ करीत मुदत देऊ केली आहे.

- सुमारे अर्धा तास संशयितांची न्यायाधीशां समोर सुनावणी चालली.

- आरोपींना त्यांचे नाव आणि पोलिसांनी काही त्रास दिला का हे विचारण्यात आले.

- बचाव पक्षाच्या वकिलांनाही संशयितांना भेटू दिले जात नसल्याची सूत्रांची माहिती. यामुळे बचाव पक्षाच्या वकिलांनी बाजू मांडायची कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- या घटनेत रिक्षा, मोबाईल व हुक्का यासारखे पुरावे पोलिसांनी गोळा केले असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र रिक्षा व्यतिरिक्त इतर वाहने यामध्ये असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

- या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता असून त्या तपासाठीही पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवून मगितल्याची सूत्रांची माहिती.

- बचाव पक्षाचे वकील बाहेर येताच पालकांनी त्यांना एकच गराडा घालत काय झाले अशी विचारणा सूरु केली. तसेच मुलांना एकदा भेटू देणे, त्यांना कपडे व जेवण देता येईल का अशी विचारणा देखील पालकांनी केली. मात्र वकिलांनी पालकांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा: इंदापूर नगरपरिषदेमार्फत कचरा अलग करो अमृतमहोत्सव : अंकिता शहा

- या प्रकणातील 5 आरोपींची गुरुवारी न्यायलायत सुनावणी होणार आहे. मात्र त्यांच्या पालकांनी आजच न्यायलयात गर्दी केली होती. त्यांनाही वकिलांनी तुमच्या मुलाची उद्या सुनावणी असल्याचे सांगत शांत रहाण्याचा सल्ला दिला.

- यामध्ये राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याचा संशय वारंवार व्यक्त केला जात असून बुधवारी राजकीय पक्षाचे काही कार्यकर्तेही न्यायालय आवारात उपस्थित होते.

मोठा पोलीस बंदोबस्त

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरोपींच्या नातेवाईकांनी दुपारी 12 वाजल्या पासूनच आवारात गर्दी केली होती. आरोपींना न्यायलयात आणताना पोलिसांनी आवारातील नातेवाईक, इतर केस मधील नागरिक सर्वांना एक तास बाहेर जाण्याची विनंती केली. नातेवाईक हटत नसल्याने अखेर पोलिसांनी सर्वांना जबरदस्ती बाहेर जाण्यास सांगितले.

loading image
go to top