esakal | मुंबईकर तरूणांचं लसीकरण नक्की केव्हापासून? महापौर म्हणतात...

बोलून बातमी शोधा

kishori pednekar

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी साधला संवाद

मुंबईकर तरूणांचं लसीकरण नक्की केव्हापासून? महापौर म्हणतात...
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये लसीकरणाबद्दल मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण झाली आहे. सध्याच्या घडीला लसीकरण हाच कोरोनाला रोखण्याचा एकमेव मार्ग असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे नागरीक मोठ्या संख्येने लसीकरणासाठी विविध केंद्रांवर येत आहेत. सध्या ४५ पुढील वयोगटासाठी लसीकरण सुरु आहे. येत्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरु होणार आहे. पण लसीचा पुरवठा कायम राहण्याची खात्री नसल्यामुळे तरूणांना लसीकरणासाठी वाट पाहावी लागणार आहे. तरूणवर्गाला लस केव्हापासून मिळणार हा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे. त्याबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक वक्तव्य केलं.

हेही वाचा: हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत लसीकरण थांबलं

"कोविड सेंटरमध्ये नागरिक नोंदणी न करता गर्दी करत आहेत. माझी विनंती आहे त्यांना की कृपया नोंदणी करूनच या. आज अनेकांना नोंदणी न करता प्रवेश दिला आहे. मात्र उद्यापासून पूर्वनोंदणी नसलेल्यांना प्रवेश दिला जाणार नाही. ज्या पद्धतीने लस आपल्याला मिळतील, त्या पद्धतीने लसी टोचल्या जातील. महत्त्वाचं म्हणजे तरुणांना १५ मे नंतर लस दिली जाणार आहे. त्यामुळे त्यांनी आता गर्दी करू नये", असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा: Corona Virus vaccine: लस ठेवण्यासाठी मुंबई सज्ज, व्हॅक्सिन कुठे स्टोर करणार

"सध्या राज्यातील अनेक लोकांना लस दिली जात आहे. त्यातही आम्ही सध्या दुसऱ्या डोससाठी येणाऱ्यांना प्राधान्य देत आहोत. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर योग्य असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे दुसऱ्या डोसवाल्या नागरिकांना आम्ही आधी डोस देऊ. मग नव्या वर्गाचं लसीकरण सुरू होईल", असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचा: असं झालं तर लसीकरण सुरूच करणार नाही- मुंबई महापालिका

१ मे ला नव्या वर्गाचं लसीकरण सुरू करणं राज्याला शक्य नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याआधीच सांगितलं होतं. या वयोगटातील लोकांचे लसीकरण हे केवळ ६ महिन्यात पूर्ण करायचे आहे. त्या अनुषंगाने दर महिन्याला २ कोटी डोसेसची राज्याला गरज आहे. राज्याच्या आरोग्य विभागात ती क्षमता आहे. पण लसींच्या तुटवड्यामुळे या वयोगटातील लोकांचे लसीकरण इच्छा असूनही १ मे रोजी सुरू करणं शक्य नाही, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं होतं.