नालासोपारा स्फोटके प्रकरणात आणखी एक यश... वाचा कोणाला झाली अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

दहशतवादविरोधी पथकाकडून बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्याला अटक

मुंबई : नालासोपारा स्फोटके प्रकरण व पुण्यातील सनबर्न म्युझिक फेस्टिव्हलमध्ये घातपात घडवण्याच्या कटात सहभागी असलेल्या आरोपीला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पश्‍चिम बंगाल येथून अटक केली. प्रसाद जुदिष्टर हजारा ऊर्फ प्रताप हजारा (34) असे त्याचे नाव आहे. यापूर्वी पोलिसांनी 12 जणांना अटक केली असून, हजारा यानेच इतर आरोपींना गावठी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक पाण्याअभावी खोळंबल्या शस्त्रक्रिया

पुण्यात 2017 मध्ये झालेल्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींचा कट एटीएसने उधळला. या कटात वैभव राऊत आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग असल्याचे निश्‍चित झाल्यानंतर पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली. या प्रकरणी एटीएसने सुरुवातीला वैभव राऊत, श्रीकांत पांगारकर, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या चौघांना अटक केली. कळसकरकडून ताब्यात घेतलेल्या संगणकातील माहितीवरून हे आरोपी पुण्यातील पाश्‍चिमात्य संगीत महोत्सवात आणि बेळगावमधील पद्मावत चित्रपटगृहात बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याचे पुढे आले. 

महत्वाची बातमी महाअधिवेशनाच्या दिवशीच मनसेला मोठा धक्का

धर्मरक्षणासाठी हे कृत्य करणार होतो, असे त्यांनी चौकशीत सांगितले होते. त्यासाठी माजी नगरसेवक पांगारकर आर्थिक मदत करणार असल्याचे उघड झाले, अशी माहिती एटीएसने दिली. या कटात महत्त्वाची भूमिका बजावणारा म्हणजे आरोपींना बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देणारा मुख्य आरोपी प्रसाद हजारा फरारी होता. पोलिस मागावर असल्याने तो नाव बदलून पश्‍चिम बंगालमध्ये वावरत होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर एटीएसने पश्‍चिम बंगालमधील उष्ठी येथून त्याला अटक केली. त्याची अटक महत्त्वाची मानली जात आहे. त्याच्या चौकशीतून इतर आरोपींपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

मोठी बातमी जाणून घ्या कसं केलं जातं 'फोन टॅपिंग' किंवा 'स्नूपिंग'

सांकेतिक भाषा उलगडण्याचा प्रयत्न 
वैभव राऊतच्या घरातून जप्त करण्यात आलेला स्फोटकांचा साठा वेगवेगळ्या ठिकाणी घातपात घडवण्यासाठी वापरण्यात येणार होता. ही स्फोटके मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातून आणण्यात आली होती. राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर यांनी शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण प्रसाद हजाराकडून घेतले होते. महाराष्ट्रातील दोन ठिकाणी आणि अन्य राज्यांत त्याने हे प्रशिक्षण दिले होते.

हे वाचलेय का.. "राज ठाकरे यांच्या हिंदुत्वामागे शरद पवार यांचं डोकं"

आरोपी एकमेकांशी सांकेतिक भाषेत संवाद साधत असत. राऊत हा अटकेतील अन्य आरोपी व काही व्यक्तींच्या संपर्कात होता. त्यांच्यातील सांकेतिक भाषेतील संवाद उलगडण्यासाठी कसून चौकशी केली जाणार असून, त्यातून आणखी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतील, असे पोलिसांनी सांगितले.

Nalasopara explosives case


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nalasopara explosives case