नक्षलवाद्यांनीही कोरोनाची लागण? 

अनिश पाटील
Tuesday, 7 April 2020

आदिवासींना औषधे पुरवण्यासाठी निर्णय; इतिहासातील पहिलीच घटना 

मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना त्याचा धसका नक्षलवाद्यांनीही घेतल्याचे समोर आले आहे. गडचिरोली, नंदुरबार, धुळे परिसरातील जंगलात राहणाऱ्या आदिवासींना कोरोनाची लक्षणे दिसत असून, त्यांच्यासाठी राज्य तसेच जिल्हा पातळीवरून औषधोपचार करण्याची मागणी नक्षलवाद्यांनी केली आहे. या वेळी आरोग्य पथकावर कोणतीही नक्षलवादी संघटना गोळीबार करणार नाही; तर मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधी करणार असल्याची माहिती नक्षलवाद्यांनी एका व्हिडीओमार्फत दिली आहे. प्रत्यक्षात काही नक्षलवाद्यांना कोरोनासदृश लक्षणे दिसत असल्यामुळे हा कांगावा सुरू असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणा व्यक्त करत आहेत.

हेही वाचा...सोशल व्हायरसपासून दूर रहा 

देशाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली असल्याची माहिती नक्षलवादविरोधी पथकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ज्या नक्षलवादी संघटनांनी गोळीचे उत्तर गोळीने दिले, तसेच या नक्षलवादी संघटनांनी सरकारी यंत्रणा तसेच पोलिस यंत्रणेला सातत्याने लक्ष्य केले; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी सपशेल शरणागती पत्करली आहे. नक्षलवाद्यांची विचारधारा ज्या विचारांवर आधारित आहे, त्या विचारांच्या चीनवरही हतबल होण्याची वेळ आली आहे. यामुळे नक्षलवाद्यांना मिळणारा पैसा, शस्त्रे तसेच अन्य स्वरूपातील मदत थंडावली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

देशांत 29 राज्यांतील 752 जिल्ह्यांत नक्षलवाद्यांनी हात-पाय पसरले आहेत; तर नक्षलवाद्यांचे सध्या 42 गट असून, या गटांनी ग्रामीणनंतर मोठ्या प्रमाणांत शहरी भागात प्रवेश केला आहे. मुंबई, पुणेसारख्या शहरांतदेखील नक्षलवाद्यांची संख्या मोठी आहे; मात्र सध्या याच शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे; तर राज्यातील ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे. यातून नक्षलीही सुटले नसल्याची शक्‍यता आहे, पण ते थेट जाहीर करण्यापेक्षा नक्षलवादी संघटना त्यासाठी आता आदिवासींच्या आरोग्याचे कारण पुढे करत असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. 

हेही वाचा... प्राण्यांनाही होतोय कोरोना 

नक्षलींनाही कोरोनाची लागण? 
नक्षलवाद्यांचे प्राबल्य ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी राहत असलेल्या आदिवासींची वैद्यकीय चाचणीदेखील आवश्‍यक असल्याचे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. कारण या आदिवासींचा मुक्त संचार असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास वेळ लागणार नाही. यामुळे नक्षलवाद्यांनी मागितलेली मदत तसेच शस्त्रसंधीचे दिलेले आश्‍वासन यावर विश्‍वास ठेवून नेमकी कोणती पावले उचलली जातील हे लवकरच जाहीर केले जाईल, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Naxalites Decision to supply medicines to tribals; The first event in history

टॉपिकस