कोरोनाबाधितांचा आकडा 61 वर, शहापूर तालुक्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन

कोरोनाबाधितांचा आकडा 61 वर, शहापूर तालुक्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन

शहापूर/किन्हवली : शहापूर तालुक्यात बुधवारी रात्री कोरोनाबाधित तब्बल दहा रुग्ण समोर आल्याने तालुक्यातील नागरिक धास्तावले आहेत. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांनी गुरुवारी सर्वपक्षीय पदाधिकारी व अधिकारी यांच्यासह ग्रामपंचायत प्रशासनाची आढावा बैठक शहापूर विश्रामगृह येथे घेतली. या बैठकीत 22 मे ते 31 मेपर्यंत संपूर्ण शहापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी आमदारानी सर्वपक्षीय अध्यक्ष व जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले असून तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन कमिटीसह, पंचायत समिती, नगर पंचायत प्रशासन व तालुक्यातील पोलिस प्रशासनाला याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

आढावा बैठकीला तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, शहापूर नगरपंचायतीचे नगरसेवक व पदाधिकारी, चेरपोली, वाफे, गोठेघर, आसनगाव, कळंभे, ग्रामपंचायत प्रशासन अधिकारी, तालुक्यातील शहापूर, किन्हवली, कसारा, वासिंद पोलिस ठाण्याचे अधिकारी, पंचायत समिती प्रशासन, वैद्यकीय अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी उपस्थित होते.

शहापूर तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी शहापूर नगरपंचायतीसह तालुक्यातील सर्व बाजारपेठ व तालुका बंद ठेवणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आमदार दौलत दरोडा यांनी सांगितले. केवळ मेडिकल व रुग्णालये खुली राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय 21 मेच्या मध्यरात्री 12 पासून सुरू होणार असून 31 मेपर्यंत लागू असणार आहे. नागरिकांनी या काळात सहकार्य करण्याचे आवाहन दरोडा यांनी केले आहे.

शहापुरात रुग्णांचा आकडा 61
तालुक्यात आतापर्यंत 61 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शहापुरात 12 तर वासिंद, कसारा, शेलवली (बां), अल्याणी, खातीवली, कळंभे आदी ठिकाणी 49 असे एकूण 61 रुग्ण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांच्या संपर्कातील तब्बल 632 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com