मोठी बातमी : राज्यातील केवळ 'इतकेच' विद्यार्थीच ऑनलाईन शिक्षणाच्या कक्षेत; युनिसेफ आणि एससीईआरटीचे सर्वेक्षण

online education
online education

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देण्याच्या हेतूने ‘एससीईआरटी’तर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी गृह अध्ययन संचाची निर्मिती केली आहे. याचा लाभ किती विद्यार्थी घेत आहेत हे समजून घेण्यासाठी एक सर्वेक्षण करण्यात आले. शाळा बंद असण्याच्या कालावधीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून गृह अध्ययनाची माध्यमे, अभ्यासक्रम, मुलांसाठी कोरोनाची माहिती, दीक्षा अॅपचा वापर, रेडिओ कार्यक्रम, दूरदर्शनवरील गली गली सिम सिम हा कार्यक्रम आणि इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी करिअरपोर्टल हे विविध कार्यक्रम राबविण्यात येत होते. या उपक्रमांचा प्रत्यक्ष वापर करणारी विद्यार्थी संख्या जलद मूल्यांकनातून शोधण्यात आली. 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सरकारने ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. मात्र, ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी केवळ 50 टक्के विद्यार्थ्यांकडेच सुविधा उपलब्ध असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि युनिसेफ यांनी कलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

जलद मूल्यांकनात मुंबईसह 72 तालुक्यातील एकूण 760 सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नमुना शाळांपैकी 737 शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये इयत्ता पहिली ते आठवीतील 7 हजार 600 विद्यार्थ्यांचे सर्वैक्षण केले. सर्वेक्षणातून 3 हजार 304 मुले व 3 हजार 551मुलींचे मूल्यांकन करण्यात आले. त्यापैकी 1 हजार 446 (21टक्के) विद्यार्थी शहरी भागातील 5 हजार 409 (79 टक्के) विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याचे दिसून आले आहे.

90 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांकडे फोन व वीजपुरवठा असल्याचे दिसून आले. तर सुमारे 70 टक्के लोकांकडे टीव्ही आहे. जवळपास 60 टक्के लोकांकडे इंटरनेटसह स्मार्टफोन आहे. 45 टक्के लोकांकडे रेडिओ आहे. तसेच डेस्कटॉप आणि लॅपटॉपची उपलब्धता खूप कमी लोकांकडे असल्याचे दिसून आले. 59.8 टक्के कुटुंबांमध्ये स्मार्टफोन वापरण्यात येतो. स्मार्टफोन वापराच्या बाबतीत ग्रामीण भागात 56.8 टक्के पालक व शहरी भागात 70.7 टक्के पालक स्मार्टफोनचा वापर करत आहे. अनुसूचित जमातीच्या कुटुंबांमध्ये स्मार्टफोनचा वापर सर्वात कमी म्हणजे 42.6 टक्के व सर्वसाधारण सामाजिक गटांमध्ये स्मार्टफोन वापरण्याचे प्रमाण 73.5 टक्के आहे. 

17 टक्के कुटुंबांमध्ये स्मार्टफोन, इंटरनेट, रेडिओ, टिव्हिसारख्या सुविधा उपलब्ध नाहीत. नाशिक आणि नागपूर शिक्षण विभागात 20 टक्के पेक्षा अधिक लोकांकडे सुविधा उपलब्ध नाहीत. सद्यस्थितीत डिजिटल सामग्री द्वारे 50 टक्के मुले गृह अध्ययन संच वापरू शकतात. मुला-मुलींमध्ये डिजिटल सामग्री द्वारे गृह अध्ययन संच वापराबाबतीत कोणताही लक्षणीय फरक नसला तरीही, शहरी व ग्रामीण, विशेष गरजा असणारी मुले, सामाजिक गट यानुसार लक्षणीय फरक आहे. गृह अध्ययन संच वापरणाऱ्या मुलांच्या टक्केवारीत पुणे विभाग सर्वाधिक 64.4 टक्के व अमरावती विभाग सर्वांत कमी 31.4.टक्के आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com