लॉकडाऊनवर मात करत तरुणाने शोधला स्वयंरोजगाराचा मार्ग, सुरु केला 'हा' व्यवसाय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

लॉकडाऊनमुळे अनेकांपुढे रोजगार आणि रोजीरोटीचा गंभीर प्रश्न उपस्थित राहिला. पुढील काळ अंधारमय असतानाही यातूनही काहींनी यावर मात करत भविष्याचा मार्ग चोखळण्याचा प्रयत्न केला आहे.

अलिबाग : लॉकडाऊनमुळे अनेकांपुढे रोजगार आणि रोजीरोटीचा गंभीर प्रश्न उपस्थित राहिला. पुढील काळ अंधारमय असतानाही यातूनही काहींनी यावर मात करत भविष्याचा मार्ग चोखळण्याचा प्रयत्न केला आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील रूपेश कळंबे या तरुणाने लॉकडाऊनच्या कालावधीत हातावर हात घेऊन न बसता अंगमेहनतीने शेळीपालनासाठी चार लाख रुपयांची शेड उभारली आहे. 

मोठी बातमी : रायगड एक्‍स्प्रेस सुधीर तांडेल यांचे निधन 

लॉकडाऊनमध्ये हजारो तरुण रायगड जिल्ह्यात परत आलेले असून, कठीण प्रसंगातही चांगली संधी निर्माण करता येते हे तुर्बे खु. येथील रूपेश कळंबे या तरुणाने दाखवून दिले आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर 27 मार्चला रूपेश दरमजल करीत आपली पत्नी आणि पाच महिन्यांच्या मुलासह तुर्बे खुर्द येथे आला होता. गावाला आल्यानंतर करायचे काय हा यक्ष्यप्रश्न त्याच्या समोर उभा असतानात स्वदेश फाऊंडेशनचे संतोष जाधव यांच्याशी ओळख झाली. शेळीपालन व्यवसाय कसा करतात याची प्राथमिक माहिती रूपेशला नव्हती.

हे ही वाचा : हळूहळू उद्योग खुलण्यास सुरवात; राज्यात २५ हजार कंपन्या सुरु, सहा लाख कामगार रुजू

संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनातून त्याने शेळापालनाचा निर्णय घेतला. शेड उभारण्यासाठी पैसे कमी पडत असताना त्याने पीएफमधून पन्नास हजार रुपये काढून घेतले. हातातील काही पुंजी रक्कम आणि वडिलांकडून थोडी आर्थिक मदत घेत अद्ययावत शेड उभारण्याचे इंद्रधनु खांद्यावर घेतले. यासाठी वेल्डिंग व्यवसाय करणाऱ्या मामाची आणि भावाची मोठी मदत झाली. सात वर्षापूर्वी विकत घेतलेल्या 20 गुंठे शेतजमिनीमध्ये मागील दीड महिने अंगमेहनतीने रूपेश कळंबे यांनी मोठी शेड उभारली आहे. यात सुरुवातीला पंचवीस शेळ्या ठेवता येणार आहेत. या शेडबरोबरच बाजूलाच त्याने कुक्कुटपालनासाठी शेड उभारली आहे. या दोन्ही शेड उभारण्यासाठी साधारण चार ते साडेचार लाख रुपये खर्च झाला असता तेच शेड साधारण दीड लाख रुपयांमध्ये पूर्ण झालेले आहे.

नक्की वाचा रतन खत्री होता तरी कोण? करोडोची बक्कळ माया त्याने कशी जमवली? वाचा हा लेख...

लॉकडाऊनमध्ये गावाकडे आल्यानंतर भविष्याचा मार्ग अंधारमय होता. काय करायचे हे सुचत नसताना स्वदेश फाऊंडेशनचे मार्गदर्शन मिळाले. शेळीपालन करण्याचे ठरल्यानंतर शेड उभारण्यासाठी पैसा नव्हता. अंबरनाथ येथे एका कंपनीत ऑपरेटर म्हणून मी काम करीत असताना काही प्रमाणात पीएफ जमा झाला होता. हा पीएफ काढून शेड बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. आता मुंबईला फक्त घरातील भांडीकुंडी आणण्यासाठी जाणार आहे.
- रूपेश कळंबे
तुर्बे खुर्द, पोलादपूर

 

प्रयत्न केल्यास ग्रामीण भागात रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात, हे पटवून देण्यासाठी स्वदेश फाऊंडेशनकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. कोरोनामुळे शहरातील जीवन किती अस्थिर 
आहे, हे दिसून आल्याने मुंबई, गुजरातमध्ये काम करणारे चाकरमानी कायमस्वरूपी पुन्हा जिल्ह्यात परतण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत.
- तुषार इनामदार,
व्यवस्थापक, स्वदेश फाऊंडेशन

Overcome lockdown, the young man found a way to become self-employed


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Overcome lockdown, the young man found a way to become self-employed