esakal | पालघर जिल्ह्याला अजूनही हक्काच्या पालकमंत्र्यांची प्रतीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर जिल्ह्याला अजूनही हक्काच्या पालकमंत्र्यांची प्रतीक्षा

पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीला मंत्रीपद देऊन पालकमंत्री बनवा अशी मागणी

पालघर जिल्ह्याला अजूनही हक्काच्या पालकमंत्र्यांची प्रतीक्षा

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार: पालघर जिल्ह्यावर गेल्या वर्षभरापासून अनेक संकटे आली. परंतु या संकटाच्या काळात पालकमंत्री मात्र गायब असल्याचे दिसून आले. संकटाच्या काळात पालकमंत्र्यानी जिल्ह्याकडे लक्ष देणे अपेक्षित असताना येथील पालकमंत्री मात्र मालेगावमध्येच अडकून पडल्याचे वारंवार दिसून आले. कोरोना महामारीच्या काळात पालघर जिल्ह्यावर अस्मानी संकट कोसळलं. एकामागून एक धक्कादायक, दुर्देवी घटना घडल्या. अनेक निष्पांपाचे प्राण गेले. प्रशासन हतबल झाल्याचे दिसले. पण असे असताना जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे संवेदनशील समजल्या जाणाऱ्या आदिवासीबहुल पालघरला फारसा वेळ देताना दिसत नाहीत. (Palghar District wants Full Time Guardian Minister for their well being development)

हेही वाचा: मुंबईकरांना तूर्तास फायझरची लस नाही मिळणार कारण...

पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची जिल्ह्याप्रती असलेली अनास्था वारंवार दिसून आली आहे. म्हणूनच पालघर जिल्ह्याला एखाद्या लोकप्रतिनिधीला मंत्रीपद देऊन पालकमंत्री बनवले जावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सध्या वसई विरार शहर कोरोनामुळे धोकादायक बनले आहे. 12 एप्रिलला नालासोपा-यातील विनायका हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजनअभावी सात रुग्ण दगावले होते. त्यानंतर 23 एप्रिलला वसईवर मोठें संकट कोसळलें. विरारमधील विजय वल्लभ हॉस्पीटलमध्ये लागलेल्या आगीत 15 कोरोनाबाधित रुग्णांचा जीव गेला. एकट्या एप्रिल महिन्यात कोरोनाने अनेकांचे बळी घेतले होते. विनायका हॉस्पीटलमधील मृत्यू आणि ऑक्सीजनचातुटवडा यामुळे रुग्ण दगावल्याची आकडेवारी वसई विरार महापालिका लपवत असल्याचे उजेडात आल्यावर मोठा गदारोळ उठला होता. तेव्हा दादा भुसे यांच्यावर टिकेची झोड उठू लागली म्हणून भुसे यांनी घाईघाईतच 21 एप्रिलला वसई विरारसह पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा धावता दौरा केला. यातही मोठे राजकारण झाले.

हेही वाचा: "खरं भुताटकी मंत्रालय 'मातोश्री' बंगल्यावर"; राणेंचे टीकास्त्र

आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, राजेश पाटील यांना पालकमंत्री महापालिकेत दुपारी तीन वाजता येत असल्याची माहिती देण्यात आली. पण, पालकमंत्र्यांच्या बैठकीचे साधे निमंत्रणही दिले गेले नव्हते. यावर कहर म्हणजे पालकमंत्र्यांची वेळ अचानक बदलली गेली. भुसे बारा वाजता येणार असल्याची माहिती लोकप्रतिनिधींना साडेअकरा वाजता देण्यात आली. त्यामुळे पालकमंत्र्यांपुढे अनेक प्रश्न मांडण्याची इच्छा असतानाही लोकप्रतिनिधी जाऊ शकले नाहीत. भुसे आले, त्यांनी धावता दौरा केला आणि निघूनही गेले. त्यामुळे भुसे यांच्या धावत्या दौऱ्याचे फलित काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला होता. हा वाद सुरु असतानाच भुसे यांच्या दौऱ्यांच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजे 23 एप्रिलला विरारमधील विजय वल्लभ हॉस्पीटलमध्ये अग्निकांड होऊन पंधरा जणांचा बळी गेला. याहीवेळी दूरवरचे पालकमंत्री पालघर जिल्ह्यात, घटनास्थळी उशिराने पोहोचले.

हेही वाचा: उद्धव ठाकरे हे कोकणात पिकनिकला गेले होते? - नारायण राणे

गेल्या सोमवारी चक्रीवादळाने वसई विरारसह पालघर जिल्ह्याला मोठा तडाखा दिला. सहा जणांचे प्राणही गेले. मच्छिमार, बागायतदार, शेतकरी यांचे आतोनात नुकसान झाले. वसई विरारसह जिल्ह्यातील बहुतांश भागात तब्बल चार दिवस वीज गायब होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पण, पालकमंत्री दादा भुसे यांना जिल्हयात पोचायला शुक्रवार उजाडला. तेही नेहमीप्रमाणे धावता दौरा करून, घोषणाबाजी करून भुसे निघूनही गेले. मध्यंतरी जिल्ह्यात कोरोनाने कहर वाढला असताना व्हेंटीलेटरची कमतरता होती. अशाचवेळी पालघरमधील व्हेंटीलेटर ठाण्याला दिले गेले. हा विषय पत्रकारांनी उपस्थित केला असता भुसे यांनी व्हेंटीलेटर पडून होते असे असंवेदनशिल उत्तर दिले. १० मे पर्यंत ठाणे जिल्हयाला १४ लाख ७ हजार ५१८ लसीचे डोस देण्यात आले असताना पालघर जिल्ह्याला मात्र २ लाख ८१ हजार ७६४ लसीचे डोस मिळाल्याकडे लक्ष वेधले असता भुसे यांनी लसीचे नियोजन केंद्र सरकार करीत असल्याचे उत्तर देऊन पालघर जिल्हयाबद्दलची अनास्था दाखवून दिली, अशी लोकांची भावना आहे.

हेही वाचा: राज आणि उद्धव ठाकरेंच्या शिक्षिकेला वादळाच्या तडाख्याचा फटका

ठाणे जिल्हयात असल्याने आदिवासीबहुल पालघर विकासापासून वंचित रहात असल्याने पालघर जिल्हा व्हावा यासाठी 25 वर्षे संघर्ष झाल्यानंतर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने 13 जून 2014 ला निर्णय घेऊन 1 ऑगस्ट 2014 पासून पालघर जिल्हा अस्तित्वात आणला. कोरोना महामारीच्या काळात भुसेंनी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच वेळी जिल्ह्यात हजेरी लावून जिल्हयाप्रती अनास्था दाखवून दिली आहे.भुसेंचे अपयश पाहता पालकमंत्री जिल्ह्यातीलच असावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन सात वर्षांच्या कालावधी होत आला आहे. जिल्हयाला अद्याप स्वतःचे मुख्यालय नाही. मुख्यालयाच्या इमारतीचें बांधकाम अजून सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक महत्वाच्या विभागातील महत्वाचे पदे रिक्त आहेत. काही विभागाचे काम अजून ठाण्यातूनच केले जात आहे. जिल्हयातील विभागांना स्वतःच्या इमारती नाहीत. पुरेशा अधिकारी-कर्मचा-यांअभावी अपु-या, भाड्याच्या जागेत जिल्ह्याचा कारभार सुरु आहे. यासह जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत.कुपोषण, आरोग्य, शिक्षणाचा समस्या गंभीर आहेत. सर्वचदृष्टीने जिल्हा अतिसंवेदनशिल बनला आहे. त्यासाठी प्रत्येक प्रश्नांची जाण असलेला, वेळेत धावून येऊन प्रश्न निकाली काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनाच पालकमंत्री का केले जात नाही, असा पालघरवासियांना पडलेला प्रश्न आहे. पालघर जिल्ह्याचं समर्थपणे नेतृत्व करतील असे अनेक नेते आहेत. राष्ट्रवादीचे विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांच्यातही जिल्ह्याचें नेतृत्व करण्याची धमक आहे. ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर भुसारा पोटतिकडीने काम करताना पहावयास मिळतात. पालघर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पालकमंत्रीपदाची त्यांना संधी मिळाली तर जिल्हयाच्या विकासासाठी नक्कीच महत्वाचा निर्णय ठरू शकतो.भाजपचे माजी खासदार चिंतामण वनगा यांचे सुपुत्र असलेल्या श्रीनिवास वनगा यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपशीच पंगा घेतला होता.श्रीनिवास वनगा लोकसभेत पराभूत झाल्यानंतर शिवसेनेने त्यांना विधानसभेत निवडून आणले आहे. त्यामुळे स्थानिक असलेल्या श्रीनिवास वनगांचाही विचार करायला हरकत नाही.पण सद्या तरी हे जर तरच प्रश्न राहिले आहेत जिल्ह्याची प्रगती आणि विकास त्याच बरोबर कोरोनाची साथ आटोक्यात आणायची असेल तर स्थानिक पालकमंत्री असणे गरजेचे असल्याचे आता खुले आम पणे बोलले जात आहे