Underground Metro Travel
ESakal
Mumbai Metro: भुयारी मेट्रोत नेटवर्क येईना! गारेगार प्रवासात मोबाईलवर बोलण्यासाठी प्रवाशांची गैरसोय
बापू सुळे
मुंबई : हॅलो... हॅलो... आवाज येतोय का, हे शब्द कुठल्या गावखेड्यातील नाहीत, तर मुंबापुरीच्या पोटातून गारेगार प्रवास करताना मुंबईकरांच्या तोंडून बाहेर पडताना ऐकू येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ ऑक्टोबर २०२४ रोजी भुयारी मेट्रो-३चा पहिला टप्पा सुरू झाला; मात्र आज एक वर्ष पूर्ण होत आले तरी गारेगार प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मोबाईलला नेटवर्क नसल्याने प्रवाशांचा पारा चढत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या या मार्गावर जवळपास ४० हजार प्रवासी धक्काबुक्की आणि वाहतूक कोंडीशिवाय गारेगार प्रवास करत आहेत; पण प्रत्येकाच्या हातात असलेला मोबाईल फोन भुयारी मेट्रो प्रवासात मोबाइलला नेटवर्क नसल्याने एकप्रकारे बिनकामाचे साधन बनत आहेत. तीन-चार मजली खोल असलेल्या या स्थानकात जाताना वरून उतरताना पहिल्या मजल्यावर नेटवर्क गायब होत आहे. अनेकांचे चालू असलेले कॉल बंद पडणे, आवाज न येणे असे प्रकार घडत आहेत. तसेच इंटरनेटअभावी प्रवासादरम्यान केली जाणारी कामेही ठप्प पडल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
२० ते ३० मीटर खोली
मेट्रो-३ ही भुयारी मेट्रो मार्गिका सुमारे २०-२५ मीटर खोलीवरून आहे, तर धारावी आणि मिठी नदी, बीकेसी येथे सुमारे ३० मीटर एवढी खोली आहे. त्यामुळे इतक्या खाली मोबाईलला रेंज मिळणे कठीण आहे. त्याची दखल घेत मेट्रो प्रशासनाने व्यवस्था करणे अपेक्षित होते; मात्र जवळपास वर्ष होत आले तरी विशेष व्यवस्था न केल्याने प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
कोट्यवधींची कमाई
राज्य सरकारने भुयारी मेट्रो प्रकल्पासाठी निधी उभारता यावा, यासाठी नरिमन पॉइंट येथे भूखंड उपलब्ध करून दिला होता. त्याच्या विक्रीतून एममएमआरसीएलने ३,४०० कोटी रुपयांहून अधिक किमतीला विकला आहे. तसेच प्रवासी तिकिटांशिवाय स्थानक आणि मेट्रोतील जाहिराती आणि जागेच्या व्यावसायिक वापराच्या माध्यमातून वर्षाला सुमारे २०० कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे. तरीही एमएमआरसीएल प्रवाशांना मोबाईल नेटवर्कसारख्या सेवा देण्यास का कमी पडत आहेत, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.
सौदीच्या कंपनीशी केलेल्या कराराचे काय?
मेट्रो-३ ने प्रवास करताना मोबाईलला रेंज आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळावी, यासाठी एमएमआरसीएलने वर्षभरापूर्वी सौदी अरेबियाच्या एसीईएसच्या उपकंपनीसोबत करार केला होता. त्याचे पुढे काहीही झाले नाही. याबाबत एमएमआरसीएलकडे विचारणा केली असता प्रतिक्रिया मिळाली नाही.
मी दररोज कॉलेजसाठी आरे-दादर असा मेट्रो प्रवास करतो; मात्र मेट्रो स्थानकात जाताच मोबाईलचे नेटवर्क मिळत नसल्याने गैरसोय होते. कोणाचाही फोन येत नाही, तसेच इंटरनेटवर सर्चही करता येत नाही.
- सुजल कासारे, विद्यार्थी
आज मोबाईल प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी कामावर जात असतानाच मेट्रो प्रवासादरम्यान कोणाला मेसेज किंवा फोन करता येत नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी एमएमआरसीएलने उपाययोजना कराव्यात.
- अनिरुद्ध नाईक, नोकरदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.