धक्कादायक ! बाळंतिणीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी क्वारंटाईन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

महापालिकेच्या नायगाव मॅटर्निटी होममध्ये प्रसूती झालेल्या एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

मुंबई :  महापालिकेच्या नायगाव मॅटर्निटी होममध्ये प्रसूती झालेल्या एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ही महिला गुरुवारी प्रसूतीसाठी दाखल झाल्यापासून अहवाल मिळेपर्यंत चार दिवस तेथील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात होती. त्यामुळे प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नक्की वाचा : म्हणून 'त्या' पाच मुली देणार कोरोनाची अग्निपरीक्षा, जाणून घ्या अधिक...

नायगाव मॅटर्निटी होममध्ये 30 एप्रिलला चुनाभट्टीत राहणाऱ्या 31 वर्षांच्या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने तिची कोरोना चाचणी करण्यात आली व वॉर्डमध्ये नेण्यात आले. शुक्रवारी (ता. 1) प्रसूती झाल्यावर तिला प्रसूती विभागात ठेवण्यात आले. त्यानंतर रविवारी (ता. 3) तिच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तोपर्यंत या महिलेची आणि तिच्या बाळाची शुश्रूषा करत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्यानंतर त्याच वॉर्डमध्ये असलेल्या अन्य दोन बाळंतिणींना तातडीने घरी पाठवण्यात आले 

हे नक्की वाचा पुतण्याचं मुख्यमंत्री काकांना पत्र, कोरोना रुग्णांसाठी राज्य सरकारला सुचवले 'हे' उपाय

नायगाव मॅटर्निटी होममधील एक डॉक्टर, पाच परिचारिका, पाच आयाबाई, पाच सफाई कामगार असे कर्मचारी 31 एप्रिलपासून या महिलेच्या संपर्कात आले होते. त्यामुळे क्वारंटाईन करून स्वॅब टेस्ट घेण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी  म्युनिसिपल मजदूर युनियनचे चिटणीस प्रदीप  नारकर यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क केला असता सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे ही वाचा : अन् दारुची दूकाने उघडलीच नाही... नवी मुंबईतील तळीरामांचा हिरमोड

रुग्णवाहिकेसाठी रखडपट्टी
रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या महिलेला पवई येथे दाखल करण्यासाठी नेले जाणार होते. परंतु, रात्री 8 वाजेपर्यंत तिला हलवण्यात अडचणी येत होत्या. वारंवार संपर्क साधूनही रुग्णवाहिका येत नव्हती. अखेर रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास तिला नायगाव मॅटर्निटी होममधून पवईला नेण्यात आल्याचे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

patient corona report positive, doctors and health workers quarantine


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: patient corona report positive, doctors and health workers quarantine