काही खरे नाही...मुसळधार पावसाने रस्त्यांची दैना; ठाणे, भिवंडीकरांचे कंबरडे मोडणार!

काही खरे नाही...मुसळधार पावसाने रस्त्यांची दैना; ठाणे, भिवंडीकरांचे कंबरडे मोडणार!

ठाणे/भिवंडी : पावसाळा आणि रस्त्यांची दुर्दशा, हे जणू समीकरणच बनले आहे. गेले काही दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत. माजीवडा, कॅडबरी, तीनहात नाका उड्डाणपुलासह नितीन कंपनी जंक्‍शन पुलावर खड्डे पडले असून अतिवृष्टीत चक्क पाण्याचे पाट वाहतात. भिवंडीतील मुंबई-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या चाविंद्रा ते वडपे बायपास रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाली आहे. वाहन चालवताना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

ठाणे शहरातून मार्गस्थ होणाऱ्या घोडबंदर रोडवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तीनहात नाका, नितीन कंपनी, माजिवडा, कापूरबावडी, पातलीपाडा हे पाच उड्डाणपूल उभारले आहेत. संततधार पावसामुळे घोडबंदर रोड जलमय होत असून मेट्रोच्या कामांमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे या उड्डाणपुलांवर खड्डे पडले असून वाहने हाकताना चालकांना कसरत करावी लागते.

मुंबईच्या दिशेने आणि घोडबंदरकडे येण्या-जाण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या ठाण्यातील माजिवडा, कॅडबरी उड्डाणपुलावर अगणित खड्डे पडले आहेत. या पुलाच्या मध्यावर आणि पुलावरून उतरताना खड्डेच खड्डे असल्याने ते चुकवताना एखादा भीषण अपघात घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता अभियंत्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

ठाण्यातून मुंबईकडे जाण्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्ग असून या हमरस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. हा रस्ता घोडबंदर रोडला जोडलेला असल्याने वाहनांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे.

उड्डाणपुलावरून मुंबईच्या दिशेने जाणारे राज्यभरातील लोकप्रतिनिधी, मंत्री-संत्री आणि नेते यांची नियमित ये-जा सुरू असते. तरीही या खड्ड्यांचे कुणालाही सोयरसुतक दिसत नसल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यावर सर्व जागे होणार का, असा सवाल विचारला जात आहे. 

भिवंडीत रस्ते दुरुस्तीकामाची पोलखोल

  • भिवंडीतील मुंबई-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या चाविंद्रा ते वडपे बायपास रस्त्याची 8 महिन्यांपूर्वीच दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, मुसळधार पावसाने दुरुस्तीकामाची पोलखोल केली असून, या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे.
  • रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकी, रिक्षा, कार व इतर मालवाहू वाहने नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी व या रस्त्याच्या दुरुस्तीचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भिवंडी पंचायत समितीचे सभापती विकास भोईर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

ठाण्यातील उड्डाणपुलावरील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात आली असून, पावसाळ्यात डांबर आणि कोल्डमिक्‍स वापरून डागडुजी केली जात आहे, परंतु संततधार पाऊस आणि सततच्या वाहतुकीमुळे दुरुस्तीमध्ये व्यत्यय येत आहे. तरीही पावसाने उसंत घेताच शनिवार-रविवारी कॉंक्रीटचा वापर करून दुरुस्ती करण्यात येणार आहे. 
- अनिरुद्ध बोर्डे 
अभियंता, एमएसआरडीसी 

----------------
संपादन : प्रणीत पवार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com