अनधिकृत नर्सिंग होमवर विधिमंडळात लक्षवेधी

File Photo
File Photo

मुंबई : मुंबईत वारंवार आगी लागत आहेत. अंधेरीतील रोल्टा कंपनीच्या इमारतीतील आग तब्बल 18 तासांनी आटोक्‍यात आली. या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील अनधिकृत असलेल्या 816 नर्सिंग होममध्ये अग्निसुरक्षा नसल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याची गंभीर बाब "सकाळ'ने उजेडात आणली होती. आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात या गंभीर विषयाची लक्षवेधी मांडण्यात आली असून राज्य सरकारच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.

परळमधील क्रिस्टल टॉवर आणि मालाडमधील बॉम्बे टॉकीजला लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुंबईतील नर्सिंग होमची तपासणी करण्याचे निर्देश अग्निशमन दलाला दिले होते. या तपासणीत सुमारे 816 नर्सिंग होम बेकायदा असल्याचे आढळून आले आहे. याबाबत "सकाळ'मध्ये 6 सप्टेंबर 2019 रोजी "मुंबईत 816 नर्सिंग होम बेकायदा' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. या नर्सिंग होममध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा नसल्याने रुग्णांच्या जीविताला धोका असल्याची बाब अधोरेखित केली होती. पालिकेचा आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाने त्यावर काही दिवस कार्यवाही केली. त्यानंतर हा गंभीर विषय मागे पडला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी मुंबईसह राज्यातील बेकायदा नर्सिंग होम आणि त्यातील अग्निसुरक्षेचा विषय लक्षवेधीद्वारे विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडला आहे. मुंबईसह राज्यातील बेकायदा नर्सिंग होम आणि रुग्णालयांवर कारवाई करण्याबाबत आणि संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व महाराष्ट्रातील हद्दीतील अनेक खासगी नर्सिंग होमचे कामकाज हे महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी अधिनियम अर्थात वैधानिक कायद्यांची तरतूद, नियम व तरतुदींचा भंग करून सुरू आहे. खासगी नर्सिंग होम आणि रुग्णालय हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अग्निशमन दल विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, नगररचना आणि इमारत व कारखाना विभाग यांच्याकडून अनिवार्य ना हरकत आणि परवानगी घेतल्याशिवाय बेकायदा कार्यरत आहेत. 

कठोर कारवाईची मागणी 
मुंबईत काही खासगी नर्सिंग होम बेकायदा आणि अनधिकृत इमारतींमध्ये सुरू आहेत. आपापल्या नर्सिंग होममध्ये बेकायदा आणि अनधिकृत बांधकामांचे विस्तार आणि बांधकाम करून अग्निसुरक्षा यंत्रणेचेही उल्लंघन केले आहे. आगी लागून मोठी जीवित आणि वित्त हानी होऊ शकते. यात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत असून सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार भुयार यांनी लक्षवेधीमध्ये केली आहे. या गंभीर विषयाचा पाठपुरावा या विषयावर काम करणारे कार्यकर्ते सुनील शिरीषकर करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com