खोट्या माहितीच्या आधारे बनावायचे ई-पास; पोलिसांनी चांगलीच घडवली अद्दल..वाचा बातमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

खोट्या माहितीच्या आधारे जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी ई-पास मिळवून देणा-या दोन चुलत भावांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. आरोपींनी अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई: खोट्या माहितीच्या आधारे जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी ई-पास मिळवून देणा-या दोन चुलत भावांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. आरोपींनी अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी ई-पास आवश्यक करण्यात आला आहे. त्याचा फायदा घेऊन गरजू लोकांची फसवणूक करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कक्ष-7 चे पोलिस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांनी बोगस ग्राहक बनून संशयीत फोन क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी दोन व्यक्तींच्या प्रवासासाठी ई-पासची मागणी केली. 

हेही वाचा: अरे वाह! मेट्रो 4 वर भारतीय कंपनीचे तब्बल 234 मेट्रो रेक; मेक इन इंडियाला प्राधान्य..

त्यावेळी आरोपीने कोविड19 चाचणी प्रमाणपत्र, वाहन चालक परवान्याची प्रत , वाहन चालकाचा दूरध्वनी, मोबाईल क्रमांक याची मागणी केली. त्यावेळी श्रीधनकर यांनी आपल्याकडे वैद्यकीय प्रमाणप नसल्याचे सांगितले. त्यावर आरोपीने ई-पास साठी पाच हजार व वैद्यकीय प्रमाणपासाठी एक हजार रुपये दयावे लागतील असे सांगितले. 

संभाषणात आरोपीने एक हजार रुपये आगाऊ रक्कम खात्यावर जमा करण्यास सांगितली. ती रक्कम जमा केल्यानंतर आरोपीने भांडूप येथे एका व्यक्तीकडे ई-पास पाठवून देत असल्याचे श्रीधनकर यांना सांगितले. त्यानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तेथे सापळा रचला होता.

त्यावेळी कारमधून तेथे एक व्यक्ती आला व त्याने जिल्हाधिकारी पुणे ग्रामीण महाराष्ट्र कार्यालयातील एक ई-पास दिला. त्याच्या बदल्यात पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी सापळा रचून पोलिसांनी अटक केली. त्यावेळी चौकशीत त्याने संपर्क साधण्यात आलेला मोबाईल क्रमांक चुलत भावाचा असल्याचे सांगितले. 

हेही वाचा: आणखी किती संकटांना तोंड द्यायचं मुंबईकरांनी? 'या' गैरसोयीसाठीही राहावं लागणार तयार

त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या भावालाही अटक केली. रविंद्र भय्यूसाहेब धिगे(39) व नामदेव शंकर धिगे(25) यांना अटक केली. रविंद्र हा कल्याण व नामदेव हा भांडूप पश्चिम येथील रहिवासी आहेत. ते घाटकोपर परिसरात कार्यरत होते. आरोपींनी अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय आरोपींनी ज्या कार्यालयातून पास मिळवला होता. तेथील कोणी कर्मचारी त्यांना मदत करत होता का याबाबत पोलिस तपास करत आहेत.

police arrest  person in fake e-pass case


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police arrest person in fake e-pass case