वसई-विरार पालिका निवडणूक प्रक्रियेला स्थगिती; प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे आयोगाला आदेश

vasai virar
vasai virar

वसई : वसई विरार शहर महापालिका प्रभाग रचनांबाबत घेतलेल्या हरकतीवर योग्य ती दाद न मिळाल्याने उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांकडून याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापात्र सादर करावे, तोवर न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिल्याची माहिती याचिकाकर्ते तथा कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस समीर वर्तक यांनी दिली आहे. वारंवार मुदत देऊन ही निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने न्यायालयाने नाराजी दर्शवली.

वर्तक यांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगर पालिकेत एकूण 115 वॉर्ड आहेत. अनेक प्रभागात मतदार संख्येत तफावत दिसून येत आहे. वॉर्ड रचना करताना 2010 व 2015 चा निकष गृहित धरला आहे. परंतु, 2010 ची वॉर्ड रचना 2001 मधील जनगणनेच्या आधारे केली होती. तर 2015 मध्ये वॉर्ड रचना 2011 च्या जनगणनेनुसार करण्यात आली होती. तेच निकष 2020 साली लावणे अयोग्य आहे. येथे भौगोलिक रचना लक्षात घेतली नाही असे वर्तक यांच्याकडून सांगण्यात आले. वसई विरार महानगरपालिकेने 25 फेब्रुवारी 2020 ला निवडणुकाबाबत अधिसूचना जाहीर करून 2 मार्च रोजी आरक्षणाची सोडत घेतली होती. त्यावेळी आरक्षण, वॉर्ड रचना, भौगोलिक रचना याबाबत वर्तक यांनी लेखी हरकती घेतल्या. 11 सप्टेंबरला विरार येथे निवडणूक निरीक्षक संजय मीना यांच्या अध्यक्षतेखाली हरकतीवर सुनावणी पार पडली. मात्र, एक हरकत मान्य करून अन्य सर्व हरकती फेटाळून लावल्याचे महानगरपालिका आयुक्त यांनी कळविले होते. 

दाद न मिळाल्याने अखेर समीर वर्तक यांनी मुंबई उच्च न्यायालयात महानगर पालिका निवडणुकाबाबत याचिका दाखल केली. याची पहिली सुनावणी 15 ऑक्‍टोबरला झाली व महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. त्यानंतर 20 ऑक्‍टोबरला राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तर 22 ऑक्‍टोबरला सुनावणीच्या वेळी राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी न्यायालयात याचिकेची प्रत मिळाली नसल्याचे सांगितले. 27 ऑक्‍टोबरला झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी असा निर्णय सुनावला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 29 ऑक्‍टोबरला होणार आहे. 

वॉर्ड रचना,आरक्षण, भौगोलिक रचना संबधी हरकती मांडल्या. मात्र, दाद न मिळाल्याने न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने चांगला निर्णय घेतला आहे. पुढील सुनावणी 29 ऑक्‍टोबरला होणार आहे. 
-समीर वर्तक, याचिकाकर्ते 

Postponement of Vasai-Virar Municipal Corporation election process

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com