esakal | सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा (Electricity) केला जाईल, अशी घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केली आहे. त्यानुसार महावितरणकडून (MSEB) तात्पुरती वीजजोडणी देण्यात येणार आहे. महावितरणच्या योजनेनुसार मंडळांनी अधिकृत (Legal) वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता असल्याने गणेश मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. तसेच मंडळाना काही सूचनाही केल्या आहेत. मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घ्यावी, गणेश उत्सव मंडपातील वीज यंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करावी, मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सूलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो.

हेही वाचा: पुणे-मुंबई महामार्गावर अपघात टाळण्यासाठी 'या' यंत्रणांचा नवीन प्रयोग

हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सूलेशन टेपने जोड देण्यात यावा. स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी, अशी सूचना मंडळाने केली आहे.

गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. काही कारणास्तव वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीजप्रवाह लघुदाब वीजवाहिनीमध्ये प्रवाहित होतो व त्यातून जीवघेण्या अपघाताची शक्यता निर्माण होते. संततधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे मंडपातील वीजयंत्रणेसह सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या लाईटिंगचे वायर्स खाली झुकलेले नाही किंवा विस्कळीत झालेले नाहीत याची दैनंदिन तपासणी करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

हेही वाचा: वर्क फ्रॉम होम करताय? कंबरदुखी टाळण्यासाठी करा हे उपाय

गणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्कीट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधीत क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तसेच तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास २४ तास उपलब्ध असलेले १९१२ किंवा १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

loading image
go to top