रुग्णालयाने बिलासाठी डिस्चार्ज नाकारला; नगरसेवकाने पीपीई कीट घातली आणि रुग्णाला चक्क उचलून बाहेर आणले

सुचिता करमरकर
Friday, 7 August 2020

दोन दिवसांपूर्वी या रुग्णाला घरी सोडण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, 97 हजार रुपये बिलाची उर्वरित रक्कम भरल्याशिवाय त्यांना घरी सोडणार नाही, असे रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या नातेवाईकांना स्पष्ट सांगितले.

कल्याण : कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून अवाजवी बिलांची आकारणी होऊ नये, यासाठी सरकार विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, यानंतरही खासगी रुग्णालयांची मुजोरी थांबत नसल्याचे समोर येत आहे. अनेक रुग्णांना बिल भरणे शक्य नसल्यामुळे त्यांना डिस्चार्जही देण्यास अडवणूक केली जाते. प्रसंगी अनेक वादावादीचे अनेक प्रसंग घडल्याचे समोर आले आहे. असाच प्रकार कल्याणमध्येही निदर्शनास आले आहे. बिलासाठी अडवलेल्या रुग्णाची शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये जात सुटका केली.

चर्चगेट स्थानकात साचलेल्या पाण्याला 'ड्रीम प्रोजेक्ट' जबाबदार? वाचा काय आहे नेमकी कारणे

कल्याण येथील श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये एका कोरोनाबाधित महिला रुग्णाला दाखल करुन घेताना 70 ते 80 हजार रुपयांचा खर्च येईल असे नातेवाईकांना सांगण्यात आले होते. त्यांनी तसे पैसेही रुग्णालयाला दिले होते. दोन दिवसांपूर्वी या रुग्णाला घरी सोडण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, 97 हजार रुपये बिलाची उर्वरित रक्कम भरल्याशिवाय त्यांना घरी सोडणार नाही, असे रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या नातेवाईकांना स्पष्ट सांगितले. मात्र एवढी रक्कम भरणे शक्य नसल्याने त्यांच्या नातेवाईकांसमोर प्रश्न निर्माण झाली.

'चेस द व्हायरस' मोहिमेला यश; मुंबईतील आणखी एक हॉटस्पॉट कोरोनामुक्तीच्या दिशेने

त्यानंतर कल्याण पूर्वेत राहणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांनी नगरसेवक महेश गायकवाड यांची यासंदर्भात भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली. या रुग्णाचे बिल गायकवाड यांनी तपासले असता बिलात पीपीई किटसाठी तब्बल 49 हजार 500 रुपयांची आकारण्यात आले होते. त्याचबरोबर रुग्णांच्या उपचारांसाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी साडेसहा हजार रुपये आकारले गेले होते. रुग्णालय प्रशासनाशी यासंदर्भात चर्चा करून गायकवाड यांनी 97 हजारांपैकी प्रत्यक्ष औषधोपचारांचा खर्च देण्याची तयारी दर्शवली. मात्र रुग्णालय प्रशासनाकडून यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. 

पाऊस तर ओसरला; मुंबईत आता मात्र डेंगी, लेप्टोचा वाढता धोका

परिणामी गायकवाड यांनी या महिला रुग्णाला रुग्णालयातून बाहेर काढण्यासाठी स्वतः पीपीई किट घातले आणि चक्क त्यांना उचलून बाहेर आणले. याच दरम्यान याठिकाणी पोलीस आल्यानंतर या रुग्णाचे उर्वरित 30 हजारांचे बिल आधार करण्यात आले. गायकवाड यांनी यासंदर्भात कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त, पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तक्रार केली आहे. 

खासगी रुग्णालयाच्या अवाजवी शुल्क आकारणीला बसणार चाप; राज्य सरकारने उचलले महत्वाचे पाऊल

याप्रकरणी या हॉस्पिटलच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकले नाही. तसेच पालिका प्रशासनाने श्रीदेवी हॉस्पिटल प्रशासनाकडून बिलाची पूर्ण माहिती मागवली आहे. रुग्णाच्या पीपीई किटसाठी एक हजार रुपये प्रतिदिन आकारले जावेत, असे शासकीय निर्देश आहेत, असे पालिका सूत्रांनी सांगितले.
 

पालिकेने घोषित केलेल्या कोव्हिड स्पेशल रुग्णालयात श्रीदेवी हॉस्पिटलचा समावेश नाही. या हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाला देण्यात येते अथवा नाही याबाबतही स्पष्ट खुलासा होत नाही. 
- महेश गायकवाड, नगरसेवक, शिवसेना

---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: private hospital charge big amount, corporator came with ppe and lift patient from hospital