COVID19 आर्थिक बाबी हाताळण्याचे आणि क्रेडिट स्कोअर सुरक्षित ठेवण्याचे काही पर्याय

COVID19 आर्थिक बाबी हाताळण्याचे आणि क्रेडिट स्कोअर सुरक्षित ठेवण्याचे काही पर्याय

सध्या उद्भवलेल्या कोविड-19च्या पार्श्वभूमीवर, या साथीचा प्रादूर्भाव रोखणे आणि जीव वाचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु, हे करत असताना, हा विषाणू अर्थव्यवस्थेवर व लोकांच्या वैयक्तिक अर्थकारणावरही परिणाम करू शकतो, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणूनच, आरोग्य व स्वच्छता राखण्यासाठी भरपूर सावधगिरी बाळगत असताना, तुमच्या क्रेडिट स्कोअरला व आर्थिक आरोग्याला कोणताही धक्का बसणार नाही, यासाठीही काही उपाय योजणे आवश्यक आहे.

पुढे दिलेल्या काही टिप्सचा अवलंब केल्यास तुम्हाला कोरोना विषाणूचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होणारा नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी आणि तुमचे आर्थिक आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी मदत होऊ शकते. 

•    जीवनशैली व लक्झरी यासाठीचा खर्च कमी करा 

कोविड-19सारखी आणीबाणीची परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्यासाठी योजल्या जाणाऱ्या उपायांपैकी एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे, विशेष महत्त्वाचे नसणारे खर्च कमी करणे. कोणत्या खर्चामध्ये किती कपात करता येऊ शकते, याचे मूल्यमापन करा. अनावश्यक असणारे खर्च रद्द करून टाका आणि अन्न, निवारा व वाहतूक अशा आवश्यक गरजांसाठी नेमके किती पैसे लागू शकतात, याचा हिशेब करा. यामुळे तुम्हाला या नाजूक परिस्थितीचा सामना करण्यासाठी मदत होईल. तुमच्या क्रेडिट कार्डाच्या वापराचाही आढावा घ्या आणि त्यावरील कर्ज वाढू नये, यासाठी शक्य ते सर्व उपाय करा. क्रेडिट कार्डाचे पेमेंट न केल्यास त्यामुळे कर्जात वाढ होऊ शकते आणि त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होऊ शकतो.

•    काँटॅक्टलेस डिजिटल पेमेंटचा अवलंब करा 

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, बँकेच्या नोटांमधून विषाणूंचे संक्रमण होऊ शकते आणि म्हणूनच काँटॅक्टलेस पेमेंट करण्याचा पर्याय निवडणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या हेतूने, ग्राहकांनी व्यवहार करण्यासाठी रोख रक्कम वापरण्याऐवजी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, मोबाइल बँकिंग अशा डिजिटल पेमेंट पद्धतींचा वापर करावा, यासाठी त्यांना उत्तेजन द्यावे, अशा सूचना सरकारने बँकांना केल्या आहेत. 

•    क्रेडिट रिपोर्ट नियमित तपासा

तुमचा क्रेडिट रिपोर्ट तुम्ही नियमितपणे तपासत असलात तरी आत्ता त्याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. सध्या निर्माण झालेल्या अनिश्चित परिस्थितीमध्ये, तुमच्या आर्थिक बाबतीत घडणाऱ्या सर्व घडामोडींकडे तुम्ही बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तसेच, कोणत्याही अनावश्यक किंवा घोटाळेखोर बाबी घडत नाहीत ना, याची दक्षता घेण्यासाठी वेळोवेळी क्रेडिट रिपोर्टवर नजर ठेवणे आवश्यक आहे. अशा गोष्टींमुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरचे मोठे नुकसान होण्यापूर्वीच तुम्ही याबाबत योग्य ती काळजी घ्यायला हवी. 

•    कर्जांचे योग्य व्यवस्थापन करा व कर्जदात्यांशी संपर्क करा 

चांगला क्रेडिट स्कोअर साध्य करण्यासाठी व कायम राखण्यासाठी क्रेडिट कार्डाची बिले व ईएमआय वेळेवर भरणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही वेळेवर पैसे भरले नाहीत तर तुम्हाला विलंब शुल्क, दंडात्मक व्याजदर भरावे लागू शकते. याचा दुष्परिणाम शेवटी तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होऊ शकतो. कोरोनाच्या साथीमुळे तुम्हाला पैसे भरणे अवघड आहे, असे वाटत असेल तर लवकरात लवकर तुमच्या कर्जदात्याशी संपर्क करा आणि दोघांनाही व्यवहार्य असेल असा सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न करा.

•    आणीबाणीच्या वेळी कर्ज म्हणून क्रेडिट कार्ड वापरणे टाळा 

कोरोनाच्या साथीमुळे तुमच्या पगारावर किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये, क्रेडिट कार्डाच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज हा अधिक व्यवहार्य पर्याय असू शकतो. क्रेडिट कार्डाच्या ईएमआयवर 18% जीएसटी आकारला जातो, क्रेडिट कार्ड परतफेडीचा कालावधी 12-48 महिने असतो, तर वैयक्तिक कर्जासाठी तो 5 वर्षांपर्यंत असू शकतो व वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत क्रेडिट कार्डावरील व्याजदर नेहमीच चढा असतो. 

•    थकलेली कर्जे भरून टाका

अशा आव्हानात्मक कालावधीमध्ये, तुम्ही अधिक प्रमाणात कर्जाची थकबाकी ठेवणे योग्य ठरणार नाही, त्यापेक्षा लवकरात लवकर कर्ज भरून टाका. कोरोनाच्या साथीमुळे आर्थिक अनिश्चितता निर्माण होऊ शकते व त्याचा परिणाम तुमच्या कर्ज परतफेडीच्या क्षमतेवर होऊ शकतो. त्यामुळे क्रेडिट स्कोअर व क्रेडिट हिस्ट्री यांच्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. अशी परिस्थिती निर्माण होणे टाळणे, ही पहिली पायरी आहे. तुमच्या कर्जांच्या परतफेडीचा प्राधान्यक्रम लावणे गरजेचे आहे. थकित कर्जांची यादी करा आणि त्यातील कोणते कर्ज सर्वप्रथम विचारात घ्यायला हवे, हे ठरवा. साधारणपणे, महागडी कर्जे भरण्यापासून सुरुवात करा. अधिक व्याजदर आकारणारी कर्जे आधी भरून टाकली तर भराव्या लागणाऱ्या एकूण व्याजामध्येही घट होईल. कारण, अधिक व्याजदर असणारी कर्जे न फेडल्यास त्यांचे व्याज पटापट साचत जाते. थकित कर्जे फेडण्यासाठी आणि कर्जाच्या विळख्यात अडकण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्हाला अनुत्पादक किंवा अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी करणाऱ्या गुंतवणुकी लिक्विडेट करता येऊ शकतात. प्राप्तिकर रिटर्न, विमा योजनेच्या मुदतपूर्तीच्या वेळी मिळालेले पैसे अशा रकमांचा वापर थकित कर्जे फेडण्यासाठी करा. 

तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला राखण्याचा प्रयत्न कराच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे महणजे सुरक्षित राहा.

read full article about how to keep your credit health fit and fine during covid 19 crisis

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com