... टीचभर पोटासाठी त्यांना साधा वडापावही मिळाला नाही!

... टीचभर पोटासाठी त्यांना साधा वडापावही मिळाला नाही!
... टीचभर पोटासाठी त्यांना साधा वडापावही मिळाला नाही!

मुंबई : राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून परळमधील टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी हजारो रुग्ण रोज येत असतात. रस्त्यावर राहून हातगाड्यांवर खाऊन त्यांचे नातेवाईक दिवस ढकलत असतात; पण आजच्या जनता कर्फ्यूमुळे मुंबई पूर्णपणे बंद झाल्याने त्यांचे हाल झाले. टीचभर पोटासाठी पायपीट करूनही साधा वडापावही न मिळाल्याने त्यांना उपाशीपोटीच राहावे लागले. आजची रात्र कशी काढायची, याची विवंचना त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होती.

दोन दिवसांपूर्वी धुळ्याहून नातवाला शस्त्रक्रियेसाठी आणले. त्याची शस्त्रक्रिया झाली. त्याच्यासोबत मुलगी रुग्णालयात आहे. मी बाहेर, पण रात्रीपासून उपाशी आहे. आज शहर बंद असेल, याची पुसटशी कल्पनाही नव्हती... अशी व्यथा मांडली भालेराव पाटील यांनी. अशीच परिस्थिती टाटा रुग्णालयाबाहेर पदपथावर राहणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची आहे. भालेराव पाटील यांच्या १८ वर्षांच्या नातवाला हाडांचा कर्करोग झाला असून त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. नातू आजाराशी लढत असताना आजोबा भुकेचा सामना करीत आहेत. नातू बरा होणे महत्त्वाचे आहे. खायला काय रात्रीही मिळेल. एक दिवस खाल्ले नाही, तर काहीच होणार नाही, अशा शब्दांत आजोबांची माया ते व्यक्त करतात.

मंगली देवी यांना कर्करोगाने ग्रासले आहे. बिहारमधील भागलपूरमधून त्या शनिवारी रात्री मुंबईत आल्या. तेव्हा त्यांनाही अंदाज नव्हता, की मुंबई आज पूर्णपणे बंद असेल. शनिवारची रात्र त्यांनी मुलासह रस्त्यावर काढली. रात्री जेवायला मिळाले; पण आज सकाळपासून सगळेच बंद होते. रेल्वेच्या प्रवासात घरून जे बांधून घेतलेले त्यातील भाकरी उरली होती. तीच सकाळी त्यांनी खाल्ली. त्यानंतर त्या उपाशीच आहेत. मंगली देवी सकाळी रुग्णालयात गेल्या तेव्हा त्यांना सोमवारी या, असे सांगण्यात आले. आता रात्री पोट कसे भरायचे, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. त्याच काळजीत त्या आपला मुलगा लल्लनकुमार याच्या सोबत एका दुकानाच्या पायरीवर बसल्या होत्या.
अशीच वेळ मधुकर तोरवणे यांच्यावर ओढावली आहे. त्यांच्या दहावीत शिकणाऱ्या मुलाला ब्रेन ट्यूमर असल्याने त्याला दोन दिवसांपासून टाटा रुग्णालयात आणण्यात आले. तोरवणेही रस्त्यावर उपाशीपोटीच बसले होते. परळचा परिसर त्यांनी पूर्णपणे पायाखाली घातला; पण साधा वडापावही त्यांना मिळू शकला नाही.

शिळ्या पदार्थावर निभावले 
टाटा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या अनेक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मुंबई ठप्प झाल्याने बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. जनता कर्फ्यूमुळे अवघे शहर निर्मनुष्य झाल्याने त्यांना खायलाही मिळाले नाही. गावावरून आणलेली भाकरी आणि कालच्या जेवणातील शिल्लक राहिलेली भात-आमटी खाऊनच त्यांनी दिवस काढला. अनेकांची तर तीही सोय नव्हती. सोमवारी परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com