मुंबईत लसीकरणाला प्रतिसाद, पहिल्या दिवशी 10 केंद्रात 1 हजार 926 जणांना लस

भाग्यश्री भुवड
Sunday, 17 January 2021

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे 9 आणि राज्य शासनाचे एक अशा एकूण 10 केंद्रांवर मिळून पहिल्या दिवशी 1 हजार 926 जणांना लस देण्यात आली.

मुंबई:  कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवार 16 जानेवारी सकाळी 11.30 वाजता मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये झाला. त्यानंतर, मुंबईतील इतर लसीकरण केंद्रात लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी हेल्थ केअर वर्कर्स आणि रुग्णालयातील कर्मचार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरणात पाहायला मिळाले. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे 9 आणि राज्य शासनाचे एक अशा एकूण 10 केंद्रांवर मिळून पहिल्या दिवशी 1 हजार 926 जणांना लस देण्यात आली होती. 

व्ही.एन.देसाई रुग्णालयातील लसीकरण मोहिमेला मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दुपारी 12.47 च्या दरम्यान महाडेश्वर आल्यानंतर या लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र, इतर ठिकाणांच्या तुलनेत व्ही.एन.देसाई रुग्णालयात सर्वात उशिरा लसीकरण सुरू झाले. ज्यामुळे सकाळी 9.30 वाजल्यापासून लसीकरणासाठी आलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांना काही तास वाट बघावी लागली. दरम्यान, 12.55 ला व्ही.एन.देसाई रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव कारंत हे कोरोना लसीकरणाचे पहिले लाभार्थी ठरले. त्यांच्यासोबत वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल जाधव यांनीही लस घेतली. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तर, खेरवाडी, गोळीबार आणि गव्हर्मेंट कॉलनी या आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचार्‍यांना लस दिली गेली. या आरोग्य केंद्रातील मिलिंद रोकडे हे पहिले लाभार्थी ठरले. रोकडे हे खेरवाडी हेल्थ पोस्टमध्ये गेली 5 वर्ष काम करतायत. लसीकरणानंतर रोकडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, लसीचा कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही. सकाळी लसीकरणासाठी वॉर रुममधून संपर्क करण्यात आला. शिवाय, व्हॉट्स अॅपवर यादी पाठवण्यात आली होती. मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे सर्वांना लस घ्यायला सांगितले आहे. आधी बीकेसी केंद्र सांगितले होते. पण, नंतर फोन करुन केंद्र बदलल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, लसीकरणासाठी जास्त वेळ वाट पाहायला लागल्याचे सांगत हेल्थ केअर वर्कर्सनी नाराजी व्यक्त केली. लसीकरणासाठी 9 ची वेळ देण्यात आली होती. पण, एक वाजून गेला तरी नंबर नाही आल्याचे खेरवाडी आरोग्य केंद्र इन्चार्ज आणि सार्वजनिक आरोग्य परिचारिका पर्णश्री गवंडे यांनी सांगितले. दरम्यान, 2 वाजेपर्यंत फक्त 37 लोकांना लसीकरण करण्यात आले होते. 

सर्वप्रथम लस देण्यात आलेल्या आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे

  • केईएम रुग्णालयात उप अधिष्ठाता डॉ. मिलिंद नाडकर
  • शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी
  • बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयात अधिष्ठाता तथा महानगरपालिकेचे संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. रमेश भारमल
  • विलेपार्लेचे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत
  • वांद्रे येथील भाभा रुग्णालयात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे
  • सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव कारंथ
  • घाटकोपरचे राजावाडी रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर
  • कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात पी/उत्तर विभागाच्या वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) डॉ.  ऋजूता बारस्कर
  • बीकेसी भव्य कोविड सुविधा केंद्रात आहारतज्ज्ञ श्रीमती मधुरा पाटील यांना सर्वप्रथम लस देण्यात आली. 

मुंबई महानगरपालिकेचे 9 आणि राज्य शासनाचे एक अशा एकूण 10 केंद्रांवर मिळून पहिल्या दिवशी 1 हजार 926 जणांना लस देण्यात आली होती. 

केंद्रनिहाय लसीकरण

पहिल्या दिवशी लसीकरणाचा शुभारंभ झाल्यानंतर सर्व केद्रांवर लसीकरणाची कार्यवाही सुरु करण्यात आली. दुपारी उशिरापर्यंत प्राप्त माहितीनुसार, परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात 243, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात 188, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयात 190, विलेपार्लेचे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात 262, वांद्रे येथील भाभा रुग्णालयात 149, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी 80, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालयात 289, कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात 266 आणि बीकेसी भव्य कोविड सुविधा केंद्रात 220 तर जेजे रुग्णालयात 39 जणांना लस देण्यात आली होती.

मुंबईत महानगरपालिकेच्यावतीने एकूण 9 लसीकरण केंद्रांवर मिळून 40 लसीकरण बूथ कार्यान्वित करण्यात आले आहेत. तर राज्य शासनाच्या वतीने जे. जे. रुग्णालय हे एक केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड 19 आजारावरील 'कोविशील्ड' या लसीचे सुमारे 1 लाख 39 हजार 500 डोस मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत.

हेही वाचा- Corona Vaccination:लसीकरणासाठी निवडलेले 50% लाभार्थी अनुपस्थित

केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार 3 टप्प्यात मान्यताप्राप्त लसींचे लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी (Health Care Worker), दुसऱ्या टप्प्यात आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी (Front Line Worker) उदाहरणार्थ जसे की स्वच्छता कर्मचारी आणि कामगार, पोलिस आणि तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील सर्व नागरिक तसेच 50 वर्षाखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी) असणारे नागरिक यांना लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्रशासनाने Co-WIN हा डिजिटल मंच विकसित केला आहे. त्या माध्यमातून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Response vaccinations Mumbai first day 1 thousand 926 people vaccinated 10 centers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Response vaccinations Mumbai first day 1 thousand 926 people vaccinated 10 centers